डोंगरकडा फाटा येथे धाडसी चोरी; अडीच लाखांचा ऐवज लंपास
By विजय पाटील | Published: January 23, 2024 03:25 PM2024-01-23T15:25:11+5:302024-01-23T15:26:21+5:30
चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री इतरही तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला, परंतु नागरिक जागे झाल्याने त्यांनी पळ काढला.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथे सोमवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या दरम्यान धाडसी चोरी झाली. यावेळी चोरट्यांनी दोन ते अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती कळताच, पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते, परंतु श्वानपथकाला चोरट्यांचा तपास लागला नाही.
२२ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान डोंगरकडा फाटा येथे राहणाऱ्या शिक्षिका शिला सुदाम वैद्य यांच्या घरी चोरट्यांनी धाक दाखवत जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये २ तोळे सोने, ३५ तोळे चांदी व रोख रकमेचा समावेश आहे. मध्यरात्री तीन ते चार चोरटे घरात आल्याची कुणकुण सुदाम वैद्य यांना लागली होती. त्यांनी दरवाजा उघडून उठून पाहिले असता काहींनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत सुदाम वैद्य हे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती सुदाम वैद्य यांनी डोंगरकडा पोलिस चौकी येथे दिली. त्यानंतर, पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. श्वानपथकाने डोंगरकडा फाटा व परिसरातील काही भागांत पाहणी केली, परंतु चोरटे कोणत्या दिशेने गेले, हे मात्र कळू शकले नाही. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, गुन्हे अन्वेषण विभागाचे विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे, रामदास ग्यादलवाड, गजानन सरकटे आदींनी पाहणी केली. चोरीच्या घटनेमुळे डोंगरकडा परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना पाहता, डोंगरकडा परिसरात पोलिसांनी अधिकची पेट्रोलिंग करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री इतरही तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला, परंतु नागरिक जागे झाल्याने त्यांनी पळ काढला.