शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा धाडसी चोरी; तीन लाखाचे दागिने व पन्नास हजार रोकड लंपास
By विजय पाटील | Published: August 26, 2023 01:45 PM2023-08-26T13:45:25+5:302023-08-26T13:46:09+5:30
ऐन खरीप हंगामात भर दिवसा चोरी झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा धाडशी चोरी होऊन जवळपास तीन लाखांचे दागिने आणि पन्नास हजार रोख रुपये चोरीला गेले. यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुसेगाव येथील शेतकरी पुरभाजी पातळे हे नेहमीप्रमाणे तारीख २५ ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या कुटुंबासोबत शेतात गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा टॉवरचे दार तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले अडीच लाखाचे दागिने व रोख पन्नास हजार रुपये असा एकूण तीन लाखाचा ऐवज चोरांनी लंपास केला.
पुरभाजी पातळे यांच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे त्यांचे सोन्याचे दागिने घरीच कपाटामध्ये ठेवले होते. जेव्हा पातळे यांच्या पत्नी व सून शेतातून घरी आल्या तेंव्हा घराच्या एकाबाजूचा दरवाजा उघडलेला दिसला. त्यानंतर कपाटाचा देखील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. होता. हा प्रकार पाहून पत्नीने आपल्या पतीला फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. यानंतर मुलगा आणि पातळे हे घरी आल्यानंतर आपल्या घरी मोठी चोरी झाली असे समजले. त्यांनी बाजूच्या लोकांना घरी चोरी झाल्याची माहिती दिली. लगेच गावातील काही लोकांनी नर्सी पोलिसांना कळविले. यानंतर तातडीने नर्सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे आणि जमादार चौधरी यांनी पुसेगाव येथे जाऊन घटनेचा पंचनामा केला.
या प्रकरणी रात्री उशिरा शिवाजी पातळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास नर्सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चिरमाडे व जमादार चौधरी हे करीत आहेत.
गावात भितीचे वातावरण....
ऐन खरीप हंगामात भर दिवसा चोरी झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतीकामे करण्यासाठी जात आहेत. हीच संधी चोरटे साधत आहेत. एकीकडे निसर्ग साथ देत नाही. तर दुसरीकडे चोरटे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.