ऐन सणासुदीत प्रवाशांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:14 AM2018-11-06T00:14:42+5:302018-11-06T00:15:33+5:30
येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. नवीन शेडमध्ये प्रवाशांना बस थांब्याची सुविधा करण्यात आली असली तरी प्रवाशांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांबपल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा मात्र ताळमेळ नाही. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. नवीन शेडमध्ये प्रवाशांना बस थांब्याची सुविधा करण्यात आली असली तरी प्रवाशांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांबपल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा मात्र ताळमेळ नाही. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारत बांधकामाचा प्रलंबित प्रश्न उशिराने का होईना अखेर मार्गी लागला. मोठ्या थाटात भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडला. परंतु नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जुनी इमारत पाडण्यास सुरूवात करण्यात आल्याने ऐन सणासुदीतच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून बसथांब्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी, या ठिकाणी साधे बसवेळापत्रकही लावण्यात आले नाही. तसेच विविध मार्गावरून धावणाऱ्या बस कोठे उभ्या राहणार आहेत, याचे फलकही डकविण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हिंगोली बसस्थानकाची जिर्ण इमारत पूर्णत: मोडकळीस आल्याने प्रवाशांची गैरसोय होते. पावसाळ्यात इमारतीला तर गळती लागते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न होता. जुनी इमारत मोडकळीस आल्याने लवकरच नवीन टोलेजंग इमारत उभी राहणार असल्याने आता या सर्व समस्यांतून सुटका होणार अशी नागरिक व प्रवाशांना आशा होती. परंतु बांधकाम प्रक्रिया संथगतिने सुरू असून प्रवाशीच हैराण आहेत.
जून महिन्यात पाडली जाणार होती इमारत...
४जूनच्या पहिल्या आठवड्यात जुने बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत उभी करण्याची तयारी सुरू होती. परंतु आॅगस्टमध्ये भूमिपूजन झाल्याने बांधकामास लवकर सुरूवात होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मंजुरी स्तरावर मार्गी लागल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी भूमिपूजनही पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते केले होते. परंतु अद्याप प्रत्यक्षात बांधकामाला प्रारंभ झाला नाही, हे विशेष. आता ऐन सणासुदीतच जुने बसस्थानक पाडले जात आहे. त्यामुळे आगार प्रशासनातील कारभाराचा ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.