पुन्हा दुकानांसाठी दिवसाआडचेच वेळापत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:34+5:302021-05-15T04:28:34+5:30
हिंगोली : जिल्ह्यात १६ ते ३० मेपर्यंत एक दिवसाआड जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांसाठी पूर्वी निश्चित केल्याप्रमाणेच वेळापत्रक कायम ...
हिंगोली : जिल्ह्यात १६ ते ३० मेपर्यंत एक दिवसाआड जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांसाठी पूर्वी निश्चित केल्याप्रमाणेच वेळापत्रक कायम ठेवत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शुक्रवारी नवे आदेश काढले आहेत.
१६, १८, २०, २२, २४, २६, २८ व ३० मे या दिवशी किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारचे अन्न जसे चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे, पाळीव प्राणी खाद्यविक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य विक्रेते यांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने उघडता येणार आहेत. दूधविक्रेत्यांना सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी असेल. ई कॉमर्स, कुरिअर सेवा या दैनंदिन चालू राहतील. बाजार समिती, कृषीसंबंधित दुकाने पूर्वीप्रमाणेच सकाळी ९ ते ६ वेळेत दैनंदिन सुरू राहतील. अत्यावश्यकव्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित दुकाने व आस्थापना एक दिवसाआड मुभा दिल्याप्रमाणे १६, १८, २०, २२, २४, २६, २८ व ३० रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ घरपोच सेवा देऊ शकतील. यासाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत पास उपलब्ध करून घ्यावेत. खानावळ, रेस्टॉरंट यांना केवळ घरपोच सुविधा देण्यासाठी ६ ते १५ मेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत परवानगी राहील.
कार्यालयीन उपस्थिती पूर्वीप्रमाणेच १५ टक्के अथवा किमान ५ कर्मचारी; तर गरजेनुसार १०० टक्के ठेवता येईल. लग्नासाठी केवळ कोर्ट मॅरेजला परवानगी आहे. खासगी प्रवासी वाहतूक केवळ ई-पास असल्यास ५० टक्क्यांच्या मर्यादेत, तेही अत्यावश्यक कारणासाठी परवानगी राहील. तर खासगी बसेस वाहतूक मनाई केली. आगारातून ही बस सोडता येणार नाही. इतर आगारांच्या बसेस थेट स्थानकात थांबतील. मालवाहतुकीच्या वाहनांना बाहेर राज्यातून माल येत असेल; तर ४८ तास अगोदरची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. ते सात दिवसांसाठी वैध मानण्यात येईल.
नोंदणीकृत उद्योग चालू ठेवता येतील. त्यासाठी तहसीलकडून ओळखपत्र घ्यावे लागेल. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार संवेदनशील राज्यातून येणाऱ्या नागरिक अथवा कामगारांसाठी निश्चित केलेले निर्बंध इतर राज्यांतून हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी लागू राहतील. इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांनी ४८ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे; तर ती नसल्यास विलगीकरणात पाठविण्यात येणार आहे.
या आदेशानुसार १५ मे रोजी सकाळी ७ ते दिनांक १ जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत आदेश पाळणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. यात दिरंगाई केल्यास अथवा आदेश न पाळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
निबंधकांना शिथिलता कायम
वरीलप्रमाणे इतर आस्थापनांना सूट दिल्याच्या दिवशी हिंगोलीसह जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये कार्यालयीन वेळेनुसार चालू राहणार आहेत. यात दस्तनोंदणी व इतर आनुषंगिक व्यवहार करता येणार आहेत.
बँकांत शेतकऱ्यांनाही एक दिवस
बँका आता रोज सुरू राहणार आहेत. मात्र बाजारपेठेला सूट दिल्याच्या दिवशी म्हणजे १६, १८ मे अशा सम तारखेच्या दिवशी व्यापारी व सर्वसामान्यांना सकाळी १० ते ४ या वेळेत ३० तारखेपर्यंत व्यवहारासाठी मुभा दिली आहे. १७, १९, २१, २३, २५, २७, २९ व ३१ मे रोजी शेतकऱ्यांच्या पीककर्जासाठी आवश्यक असणाऱ्या कामांसाठी बँका सुरू राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे एक दिवस मिळाला असल्याने आता बँकांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. बँकेतील बीसी व सीएसपीला पूर्णवेळ काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.