कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:39 PM2018-08-31T13:39:23+5:302018-08-31T13:39:46+5:30
ग्रामीण रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा आज सकाळी १० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
कळमनुरी (हिंगोली ) : ग्रामीण रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा आज सकाळी १० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अरूण भगवानराव बरडे (३५) असे मृताचे नाव असून ते या रुग्णालयात १ वर्षापासून कार्यरत होते.
आज सकाळी नेहमीप्रमाणे अरूण बरडे रुग्णालयात कामकाज करत होते. अचानक त्यांना चक्कर आल्याने ते जमीनीवर कोसळले. यावेळी त्यांना उलटीही झाली. रूग्णालयातील डॉ. फरीद खॉन यांनी बरडे यांच्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु प्रकृति गंभीर असल्याने त्यांना हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयात १०८ रूग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले. परंतु, हिंगोलीकडे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
अतिरिक्त कामाचा ताण असल्यामुळे बरडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रूग्णालयातील कर्मचारी सांगत होते. मयत अरूण बरडे हे मुळचे बुलढाणा येथील रहिवासी आहेत. एका वर्षापूर्वीच ते कळमनुरी रूग्णालयात रूजू झाले होते. ते हिंगोली येथे कुटुंबियासह राहत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
बरडे यांचा सत्कार केला होता
मयत अरूण बरडे हे २८ आॅगस्ट २०१७ रोजी कळमनुरी येथील रूग्णालयात रूजू झाले होते. एका वर्षाचा उत्कृष्ठ कामगिरीने पूर्ण पार पाडल्याने त्यांचा ३० आॅगस्ट रोजी कर्मचा-यांनी सत्कार केला होता. सत्कार केल्याने ते आनंदित होते.