सीझरनंतर स्टाफ नर्सचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:31 PM2022-04-05T19:31:18+5:302022-04-05T19:32:29+5:30
रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवून ‘सीएस’च्या दालनापुढे नातेवाईकांचा ठिय्या
हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी सिझर व्यवस्थितरित्या केले नसल्यामुळे स्टाफ नर्सचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईकांनी ५ एप्रिल रोजी ‘सीएस’ यांच्या दालनापुढे पाच-सहा तास ठिय्या मांडला. याप्रकरणी दुपारी साडेचार वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
संध्या सचिन धाबे (मोरे) या हिंगोली जिल्हा रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्यांना २ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सिझरसाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांची प्रकृती चांगली होती. त्यानंतर त्यांचे सिझर करण्यात आले. परंतु, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आले. नांदेड येथील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. परंतु, त्यांचा ४ एप्रिल रोजी नांदेड येथे मृत्यू झाला. हिंगोली जिल्हा रुग्णालयात सिझर व्यवस्थितरित्या केले असते, तर संध्या मोरे यांचा मृत्यू झाला नसता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी सिझर करतेवेळेस निष्काळजीपणा केला, त्यामुळे संध्या मोरे यांचा मृत्यू झाला. यासाठी ५ एप्रिल रोजी नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनासमोर पाच-सहा तास ठिय्या मांडला. जोपर्यंत डॉ. राठोड व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह रुग्णवाहिकेतच राहील, तो आम्ही घरी नेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. ॲड. प्रज्ञावंत मोरे, छाया मोरे, दीपक मोरे, वर्षा मोरे, किरण मोरे, सचिन ठोके, ॲड. प्रसन्नजित भगत, कैलास बनसोड आदी उपस्थित होते.
पोलीस चौकीत नातेवाईकांना बोलावले...
मृतदेह नातेवाईकांनी जिल्हा चिकित्सकांच्या दालनासमोर ठेवल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर काही मोजक्याच नातेवाईकांना पोलीस चौकीत बोलावले. काही नातेवाईक मात्र दालनातच बसून होते. दुपारी साडेचार वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
...तर कारवाई केली जाईल
संध्या मोरे यांचे सिझर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितरित्या केले नसेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नियम सर्वांना सारखे आहेत.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक
चार दिवसांच्या बाळाची प्रकृती चांगली...
सिझर केल्यानंतर संध्या मोरे यांना कन्यारत्न झाले. या मुलीची प्रकृती चांगली आहे. या बाळाला आजीजवळ ठेवण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.