आजेगावात दोन गटांत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:03 AM2018-01-16T00:03:08+5:302018-01-16T00:03:10+5:30
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी बॅनर, ध्वज लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींनुसार १६३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी बॅनर, ध्वज लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींनुसार १६३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, सपोनि रवींद्र सोनवणे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटातील पुरूष व महिलांचा जमाव ठाण्यात तक्रार दाखलसाठी आला होता. यातील मारोती गुणाजी चाटसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी रात्री ८.४५ वाजता विरोधी गटातील ६१ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
लक्ष्मण त्र्यंबक दळवी यांनी दिलेल्या विरोधी गटांतील १०२ जणांविरूद्ध भादंविच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बसचे नुकसान केल्याप्रकरणी बसचालक संतोष बगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० ते २५ अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. येथील दोन गटातील प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्याने याठिकाणी मोठा जमाव जमला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा पोलीस प्रशासनाकडून कसून शोध घेतला जात आहे.
या गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी आजेगाव येथे भेट दिली. तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन केले. या घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसह संबंधित दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दोन्ही बाजूंनी विविध प्रकारच्या आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.