पीकविम्याच्या रकमेतून होतेय कर्जकपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:57+5:302021-05-30T04:23:57+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील खरीप हंगाम ऐनवेळी अतिवृष्टीने हिरावून नेला. त्यापूर्वीच्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. आता पीकविम्याच्या ...
हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील खरीप हंगाम ऐनवेळी अतिवृष्टीने हिरावून नेला. त्यापूर्वीच्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. आता पीकविम्याच्या मंजूर रकमेतूनही इतर कर्ज कापून घेतले जात असल्याने या हंगामाची पेरणी करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशी कपात करू नये, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जवळपास १.२१ लाख शेतकरी खातेदारांना यंदा पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्याची रक्कम अजूनही पूर्णपणे खात्यावर पडली नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ६५ कोटी रुपये जमा झाले आहेत. टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जात आहे. यासाठी विमा कंपनीकडून अधिकचे मनुष्यबळ लावून ७ जूनपूर्वी सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र तत्पूर्वीच ज्यांची रक्कम जमा झाली त्यावर बँका थेट डल्ला मारत आहेत. ती रक्कम इतर कर्जाच्या नावाखाली जमा करून घेत आहेत. शेतकरी बँकेत पैसे काढायला गेल्यावर ही कारणमीमांसा सांगितली जात आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार आहे. कारण नवीन कर्ज देण्यासाठीही बँकांची भूमिका उदासीन आहे. शेतकऱ्यांचा राष्ट्रीयीकृत बँकांनी तर पुरता छळ चालविला आहे. या बँकांवर कुणाचेही नियंत्रण न राहिल्याने त्यांचे फावतच आहे.
याबाबत डॉ. पाचपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बँकांनी इतर कर्जात पीकविम्याची रक्कम वळती करू नये, अशी मागणी केली आहे.