नगरपालिका व महावितरणमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:31 AM2018-04-01T00:31:09+5:302018-04-01T00:31:09+5:30
नगरपालिका व महावितरणमध्ये पथदिव्यांच्या देयकावरून चांगलीच जुंपली आहे. १.0३ कोटींचा वीज बिल भरणा करूनही महावितरण केवळ २५ लाख रूपये भरल्याचे सांगत आहे. त्यामुळे शहरात अंधार पसरत असून एखादा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणला जबाबदार धरुन फौजदारी का करू नये, असे पत्र न.प. प्रशासनाने दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिका व महावितरणमध्ये पथदिव्यांच्या देयकावरून चांगलीच जुंपली आहे. १.0३ कोटींचा वीज बिल भरणा करूनही महावितरण केवळ २५ लाख रूपये भरल्याचे सांगत आहे. त्यामुळे शहरात अंधार पसरत असून एखादा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणला जबाबदार धरुन फौजदारी का करू नये, असे पत्र न.प. प्रशासनाने दिले आहे.
महावितरणतर्फे मागील दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. यात महावितरणने हिंगोली नगरपालिकेचा वीजपुरवठाही खंडित केला. थकीत बिल भरणा करावा, याबाबत महावितरणने न.प.ला पत्र पाठविले. परंतु त्यात नमूद रक्कम चुकीची असल्याचा आरोप पालिकेने केला आहे. हिंगोली शहरातील पथदिव्यांची विद्युत देयकाची रक्कम ज्यामध्ये मुळ थकबाकी ४.४५ कोटी व त्यावरील व्याज १.९६ कोटी असे एकूण ६.४१ कोटी थकबाकी आहे. तसेच यातील केवळ २५ लक्ष महावितणकडे पालिकेने भरणा केल्याचे म्हटले. परंतु सदर माहिती चुकीची व मोघम असून महावितरण पालिका प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी पत्रात म्हणाले. नगरपालिका कार्यालयामार्फत २०१७-१८ मध्ये एकूण १.0३ कोटींचा भरणा केला आहे. परंतु विद्युत कंपनी केवळ २५ लाख रूपयेच भरले असे म्हणत आहे. तर शहरात आयपीडीएस योजनेत कामे झाल्याने पथदिवे वाढल्याचे महावितरण सांगत आहे. ही कामे कुठे झाली? यामुळे किती नवीन ट्रान्सफार्मर व मीटर पथदिव्यांसाठी बसविले, अशी विचारणा करून महावितरणच्या मर्मावर बोट ठेवले आहे. तर मीटर रिडींगप्रमाणे देयके दाखवावी व वीज दरात झालेल्या वाढीचा तपशिलही मागितल्याने गोची होणार असल्याचे दिसत आहे.
पालिकेने चालू वर्षाचे अतिरिक्त देयके अदा करूनही महावितरणतर्फे जाणीवपूर्वक पथदिव्यांची वीज तोडली आहे. त्यामुळे जर शहरात काही अनुचित प्रकार घडला अथवा हानी झाल्यास महावितरण जबाबदार राहील, असेही पत्रात म्हटले.