विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:51+5:302021-08-14T04:34:51+5:30

नगरपरिषदेच्या नवीन इमारतीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, तर आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक ...

Dedication of various development works by the Guardian Minister | विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Next

नगरपरिषदेच्या नवीन इमारतीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, तर आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, माजी आमदार रामराव वडकुते, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, संजय बोंढारे, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे व नगरसेवकांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या, अगदी मेट्राेसिटीसारख्या सुविधा येथे निर्माण होत आहेत. नगर परिषदेत सगळेजण एकत्रित येऊन जमिनीवर उतरून काम करतात. पक्षविरहित राजकारणाची येथील पद्धत शिकण्यासारखी आहे. नगर परिषदेच्या इमारतीत फर्निचरसाठी डीपीसी अथवा नगरविकासकडून निधी देऊ. तसेच स्व. राजीव सातव यांचे नाव दिलेल्या नाट्यगृहाला खुर्च्यांची व साउंड सिस्टीमची व्यवस्थाही केली जाईल, असे आश्वासन दिले. रामलीला मैदानावर अभ्यासिकेसाठीही प्रस्ताव देण्यास सांगितले. तसेच नर्सी नामदेव संस्थानालाही निधी मिळणार असल्याचे सांगितले; तर येथील नगरसेवक खरेच चांगले काम करतात, असे कौतुक केले.

यावेळी आमदार मुटकुळे म्हणाले, आमचे तीनच नगरसेवक असताना नगराध्यक्ष कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. त्यामुळे येथे कसे मिळून-मिसळून काम चालते हे दिसते. मात्र तेच ते चेहरे निवडून येतात. यातील ५० टक्के तरी पुढच्या वेळी दिसले नाही पाहिजेत, असे खोचक विधान केले; तर दुसरीकडे शहरात जी काही कामे झाली, ती चांगली झाली; कारण तेथे नगरसेवक न गेल्याने त्यांचा दर्जा चांगला राहिला, असेही ते म्हणाले. तर पाणीचोरांना लावलेला १५ लाखांचा दंड ६८ हजारांवर आणला कसा? याची चौकशी झाली पाहिजे. रस्ते प्रकल्पाव्यतिरिक्तच्या रस्त्यांवर दोन महिन्यांतच खड्डे पडले त्याच्याही चौकशीची गरज व्यक्त केली. जलेश्वर व सिरेहकशहा तलावांच्या सुशोभीकरणाचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल, त्यासाठी पालकमंत्र्यांनी साथ द्यावी, अशी मागणी केली.

नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी शहराचा कायापालट आमच्या काळात झाला. ड्रेनेज, रस्ते, नगर परिषदेची इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, आदी कामे झाली. आता नगर परिषदेच्या इमारतीत फर्निचरसाठी निधीची आवश्यकता आहे. ती पूर्ण करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली.

उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण म्हणाले, हिंगोली ही ब वर्ग नगरपालिका असूनही महापालिकेसारख्या सुविधा निर्माण करून राज्यात आघाडीवर आहे. अनेक नवे प्रकल्प राबविले. जलेश्वर, सिरेहकशाह तलाव सुशोभीकरण, नगर परिषदेच्या इमारतीचे फर्निचर व नाट्यगृहाच्या खुर्च्यांसाठी निधीची मागणी पालकमंत्र्यांकडे केली.

प्रास्ताविकात मुख्याधिकारी कुरवाडे यांनी नगर परिषदेने ‘माझी वसुंधरा’ उपक्रमात पाच कोटींचे बक्षीस, स्वच्छ सर्वेक्षणात देशात ११व्या क्रमांकावर, ‘नागरिक प्रतिसाद’मध्ये प्रथम क्रमांक मिळवीत विविध बक्षिसे मिळविल्याचे सांगितले. तर ‘माझी वसुंधरा’ उपक्रमात २० हजार वृक्षलागवडीचा संकल्प असून ११ हजार झाडे लावली. नवीन करप्रणाली विकसित केली. इतरही उपक्रम सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी नगरसेवक बिरजू यादव, शेख निहाल, आमेर आली, अनिता सूर्यतळ, गणेश बांगर, माबूद बागवान, आरिफ लाला यांच्यासह शेख शकील, जावेद राज, दिनेश चौधरी, ॲड. राजेश गोटे, आदींची उपस्थिती होती.

नाट्यगृहाला सातव यांचे नाव

एनटीसी भागात उभारलेल्या नाट्यगृहास स्व. राजीव सातव यांचे नाव देण्याची मागणी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केली. त्यानंतर उपनगराध्यक्ष चव्हाण यांनी तो ठराव घेण्यात येईल, असे सांगितले. नगराध्यक्ष बांगर यांनी नाव देण्यासह काँग्रेसने पुतळा दिला तर तोही तेथे लावण्यात येईल, असे सांगितले.

माझ्या मात्र सर्वांना शुभेच्छा

आमदार मुटकुळे यांनी ५० टक्के नगरसेवक बदलले पाहिजेत, असे सांगितल्यानंतर पालकमंत्री गायकवाड यांनी मात्र मी सगळ्यांनाच विजयी शुभेच्छा देईन. शेवटी जय व पराजय जनतेच्या हाती आहे. त्यामुळे चांगले व्हिजन ठेवून काम करा, असा सल्ला दिला. तर नगर परिषदेमध्ये जसे पक्षविरहित राजकारण चालते तसे आमच्या डीपीसीत चालण्यासाठी आम्ही तुमच्याकडून शिकत असल्याचे सांगितले.

Web Title: Dedication of various development works by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.