फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे वेतन न कापण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:19+5:302021-05-15T04:28:19+5:30
हिंगोली : शासनाने राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा आदेश काढला ...
हिंगोली : शासनाने राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा आदेश काढला आहे. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना यातून वगळून त्यांना वाढीव विशेष वेतन देण्याची मागणी राष्ट्रीय विराट लोकमंचचे शेख नईम शेख लाल यांनी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात आपत्ती निवारणाच्या उपाययोजनाकरिता सर्व भा. प्र. से., भा. पो. से., भा. व. से व महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकोय अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे मे २०२१च्या वेतनातील एक/दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा शासन निर्णय काढला आहे. शासनाने यापूर्वी काही कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश काढले आहेत. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित पोलीस विभाग, आरोग्य विभाग व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती ठेवण्यात आली आहे. आपल्या आदेशाप्रमाणे कार्यालयात १५ टक्के कर्मचारी उपस्थिती तसेच फ्रंटलाईनवर काम न करणाऱ्या कार्यालयांमधील वेतन कपातीबाबत शासन निर्णयाचे स्वागत आहे. परंतु, अहोरात्र काम करणारे पोलीस अधिकारी/कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन कर्मचारी यांना यातून वगळण्यात यावे. शासनाच्या विविध विभागांमधील कर्मचारी व अधिकारी यांना ५ दिवस कामाचे असून, विविध सुट्ट्या लागू आहेत. परंतु, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचारी हे सातही दिवस जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना शासनाने कोविड योद्धा म्हणून उत्तेजनार्थ किंवा विशेष वाढीव वेतन देणे आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे.