हिंगोली जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:57 PM2018-10-28T23:57:02+5:302018-10-28T23:57:24+5:30
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले असून दोघांचा बळीही गेला. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तपासणी अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले असून दोघांचा बळीही गेला. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तपासणी अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला नाही.
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दिवसेंदिवस तापाचे व इतर साथरोग लागण झालेले रूग्ण येत आहेत. परंतु मागील एक महिन्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आरोग्य विभागाकडून खेडोपाडी जाऊन रक्तजल नमुने घेतले जात आहेत. शिवाय अबेटिंग व धूर फवारणी केली जात आहे. उपाय-योजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र डेंग्यू आजाराच्या रूग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. विशेष म्हणजे शहरी भागात मात्र धूरफवारणीकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली शहरात पालिकेकडून साधी धूरफवारणी होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. नगरसेवकही हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, डासांचा उपद्रव वाढत असून तापाच्या रूग्णांत वाढ होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हिंगोली शहरातील मिलिंद कॉलनी येथील शशिकला शिरपले (३७) या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडली होती. यापुर्वीही एका मुलीचा डेंग्यूने संशयास्पद मृत्यू झाला होता. परंतु याबाबत जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डेंग्यूच्या आजाराचे जिल्ह्यात थैमान सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणाही निद्रावस्थेत आहे.
आरोग्य यंत्रणेकडून डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणे गरजचे आहे. तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ ताप कमी होत नसेल तर तो डेंग्यूचा असू शकतो़ तापीमध्येच पोट दुखणे, अंग, डोके दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, अंगावर पुरळ येणे, अंग सुजणे, डोळे लाल होणे अशी तापीची लक्षणे आहेत़
कोरडा दिवस राबविण्याचा पत्ता नाही
४जिल्ह्यात सगळीकडूनच डेंग्यूसदृश्य आजाराबाबत तक्रारी वाढल्या आहेत. खाजगी रुग्णालयात अनेक रुग्ण पॉजिटीव्ह आढळले. तरीही जिल्हा प्रशासन मात्र या सर्व प्रकारावर उपाय राबविताना दिसत नाही. निदान कोरडा दिवस पाळण्याचा उपाय तरी घोषित करणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील साचलेले गटार, डबके, टायर, करवंट्यात साचलेल्या पाण्याची स्वच्छता याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय साथरोग बाबतही जनजागृती नाही.
रोजच दोनशेवर रुग्ण
४दरम्यान अनेक खाजगी रुग्णालयात दररोज दोनशेवर रुग्ण व्हायरल, डेंग्यू व इतर आजारांचे येत आहेत. यात प्रामुख्याने तापाचा आजार जडलेला रुग्णांचा मोठा समावेश आहे. एकतर शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचे रुग्णही वाढत चालले आहेत. दम्याचा आजार असलेले अनेकजण तर अंथरुणालाच खिळत आहेत. बदलत्या वातावरणासोबतच अस्वच्छता, धुळीचे प्रमाणही विविध आजारांना निमंत्रण देत आहे. याबाबत कोणीच बोलत नसल्याने हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. दोघांचा बळी गेल्यानंतरही जाग कुणालाच आली नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
रक्तजल नमुने तपासणीचा अहवालही अप्राप्तच
४जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करून संशयीत डेंग्यू आजार असलेल्या रूग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात येत आहेत. सध्या जिल्हाभरात ही मोहिम सुरू असली तरी, प्रत्येक्षरित्या उपाय-योजना होताना कुठे दिसत नाही. आरोग्य केेंद्र नर्सी अंतर्गत दाटेगाव येथे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या पथकाने भेट देऊन गृहभेटी घेतल्या. दरम्यान तापीच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. व संशयित १८ रुग्णांचे रक्त जल नमुने घेण्यात आले होते. यासह विविध गावांना भेटी देऊन अनेक रूग्णांचे रक्तजल नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. परंतु अद्याप सदर अहवाल अप्राप्तच आहेत.