हद्दपार करूनही सुधारणा होईना, आता कारागृहाचा दाखविला रस्ता; ४ महिन्यात ११ जण स्थानबद्ध
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 24, 2023 04:34 PM2023-03-24T16:34:38+5:302023-03-24T16:35:38+5:30
सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्यान्वे प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.
हिंगोली : प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने एकास एम.पी.डी.ए. कायद्यातंर्गंत थेट कारागृहाचा रस्ता दाखविला आहे. या बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.
विशाल सुरेश सांगळे (रा. पोळा मारोती जवळ, हिंगोली) असे एमपीडीए कायद्यान्वे कारवाई करून १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो मागील काही वर्षांपासून हिंगोली शहर व बासंबा पोलिस ठाणे हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहे. त्याचेवर खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग, दंगा करणे, मारमारी असे गंभीर स्वरूपाचे १२ तर गुन्हे तर अदखलपात्र ३ गुन्ह्याची नोंद आहे. तो सतत गुन्हे करीत असल्याने समाजासाठी धोकादायक बनला होता. गुन्हेगारी कृतीपाासून परावृत्त व्हावे म्हणून त्याचेविरूद्ध ३ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेशही निघाले होते. मात्र तरीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत होता. त्याचेविरूद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वे कारवाई करावी, असा प्रस्ताव हिंगोली शहर पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाची तपासणी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार प्रस्तावाची पडताळणी करून जिल्हाधिकारी पापळकर यांनी त्याचेविरूद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वे कारवाई करून एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश निर्ममित केले आहेत.
चार महिन्यात ११ जणांना केले स्थानबद्ध
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध कार्यवाहिची कडक भूमिका घेतली आहे. सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्यान्वे प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. मागील चार महिन्यात ११ जणांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वे कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.