हद्दपार आरोपीचा घरीच मुक्काम; पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नातेवाईकांचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 07:35 PM2024-02-10T19:35:09+5:302024-02-10T19:35:27+5:30
वसमत येथील प्रकार; एक कर्मचारी किरकोळ जखमी
वसमत: हद्दपारीचे आदेश असताना एकजण घरी राहत असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर कुटूंबीयांनी हल्ला चढवला. यात एक पोलिस अंमलदार किरकोळ जखमी झाला. ही घटना वसमत शहरात ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:२० वाजता घडली.
वसमत येथील जोगिंदरसिंग रणजितसिंग चव्हाण (रा. स्टेशन रोड वसमत) यास हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तरीही तो हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून घरीच राहण्यासाठी आला असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वसमत शहरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. यात पोलिसांनी जोगिंदरसिंग चव्हाण यास पकडले. या वेळी रणजितसिंग रतनसिंग चव्हाण याने चाकूचा धाक दाखवून पथकाला धक्काबुक्की केली.
तसेच रणजितसिंग, कमलकौर चव्हाण, सुलिदरसिंग चव्हाण यांनी पोलिस अंमलदार राजू गुठ्ठे यांचा हात मुरगाळून बळाचा वापर करून जोगिंदरसिंग चव्हाण यास पळवून लावले. पोलिसांनी यावेळी रणजितसिंग चव्हाण याच्या जवळील खाली पडलेला चाकू ताब्यात घेतला. या प्रकरणी राजू गुठ्ठे यांच्या फिर्यादीवरून रणजितसिंग चव्हाण, कमलकौर चव्हाण, सुलिदरसिंग चव्हाण, जोगिंदरसिंग चव्हाण (चौघे रा. स्टेशन रोड वसमत) याचेविरूद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी व शासकीय कर्तव्यापासून परावृत करण्यासाठी चाकूचा धाक दाखवून धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक मांजरमकर तपास करीत आहेत.