'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले'; शेतकऱ्याची पोलिस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 11:57 AM2022-12-30T11:57:45+5:302022-12-30T11:58:31+5:30
प्रसारमाध्यमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती, त्यानुसार केली नाही कृती.
मकोडी (हिंगोली) : थकीत वीज बिलासाठी वीज तोडू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही माझी वीज तोडली. उपमुख्यमंत्री खोटे बोलल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करून फडणवीस यांच्यावर अथवा महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तक्रार गोरेगाव पोलिस ठाण्यात एका शेतकऱ्याने केली.
सेनगाव तालुक्यातील माझोड येथील दशरथ गजानन मुळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मुळे यांच्या तक्रारीत म्हटले की, २१ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसारमाध्यमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती. यात ज्या भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा भागात वीज पुरवठा खंडित करू नये व सक्तीची वीज बिल वसुली करू नये अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले होते. तरीही वीज वितरण कंपनीने माझा वीज पुरवठा खंडित केला. माझीच नव्हे, इतर अनेकांची वीज कापली. मला अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम बिलापोटी भरावी लागली. यासाठी महावितरणने दादागिरीची भूमिका घेतली होती. यामुळे उपमुख्यमंत्री खोटे बोलल्याचे निदर्शनास आले. त्याची चौकशी करून त्यांच्यावर अन्यथा महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे गोरेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले.