अतिक्रमण काढण्यावरून उपअभियंता व कर्मचाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 05:28 PM2020-10-08T17:28:40+5:302020-10-08T17:30:30+5:30
दि. ८ रोजी सकाळी पालिकेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी शहरातील भाजीमंडईतील अतिक्रमणे काढून घेत असताना अज्ञात लोकांनी एकच गोंधळ घातला आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेऊन न. प. पाणीपुरवठा विभागातील गजानन हिरमेठ यांना व अन्य एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.
हिंगोली : नगरपालिकेमार्फत मागील काही दिवसांपासून हिंगोली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. दि. ८ रोजी सकाळी पालिकेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी शहरातील भाजीमंडईतील अतिक्रमणे काढून घेत असताना अज्ञात लोकांनी एकच गोंधळ घातला आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेऊन न. प. पाणीपुरवठा विभागातील गजानन हिरमेठ यांना व अन्य एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.
हिंगोली शहरात सध्या विविध प्रभागात जाऊन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरूवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे पथक अतिक्रमण हटवित आहे. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढणाऱ्या जागांवर प्रशासन बुल्डोजर चालवित आहे. गुरूवारी पथकाने ज्यांचे अतिक्रमण काढून घेतले त्या लोकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर काही लोक गर्दीचा फायदा घेत फरार झाले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असून संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरूवाडे म्हणाले.