कार्यकर्त्यांची नाराजी असूनही उमेदवार लढतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:41 PM2019-04-12T23:41:30+5:302019-04-12T23:41:54+5:30
लाकसभेचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याने प्रचारयंत्रणा गतिमान झाल्या आहेत. युतीचा प्रचारावर थोडा जास्त जोर दिसत असून निद्रिस्तावस्थेतील आघाडीचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे प्रचारात फिरताना दिसत आहेत.
राजकुमार देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लाकसभेचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याने प्रचारयंत्रणा गतिमान झाल्या आहेत. युतीचा प्रचारावर थोडा जास्त जोर दिसत असून निद्रिस्तावस्थेतील आघाडीचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे प्रचारात फिरताना दिसत आहेत. वंचित आघाडी, बसपाही शेवटच्या टप्प्यात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. सेना व काँग्रेस दोन्हींकडे उमेदवार बाहेरचा म्हणून कार्यकर्त्यांत नाराजी असली तरीही लढत याच दोघांत आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली विधानसभेत गट-तटांना खतपाणी घातल्याने खा.राजीव सातव व माजी आ.भाऊ राव पाटील गोरेगावकर यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे. या वितुष्टातूनच सातव यांना माघार घ्यावी लागली, अशी चर्चा काँग्रेसचीच मंडळी करताना दिसते. तर गोरेगावकर यांच्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी मिळाल्याचेही सांगितले जाते. यामुळे गोरेगावकर यांनी विधानसभेच्या दृष्टीने अधिक सक्रिय होणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादीकडून आ.रामराव वडकुते, दिलीप चव्हाण हेही प्रचारात दिसत आहेत. शिवाय सातव समर्थकांपैकी विनायक देशमुख हे थोडे जास्तच सक्रिय दिसत असून त्यांचे वैयक्तिक स्तरावरच प्रयत्न दिसत आहेत.
शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्यासाठी मात्र शिवसैनिक एकजुटीने मैदानात उतरले आहेत. गावोगाव सभा, बैठकांचा फड रंगत आहे. आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रामेश्वर शिंदे, भैय्या पाटील गोरेगावकर, रुपाली पाटील गोरेगावकर यांनी प्रचारदौऱ्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. उमेदवार हेमंत पाटील यांच्याही काही ठिकाणी सभा झाल्या. वंचित आघाडीचे मोहन राठोड यांनी कनेरगावात सभा घेतली. काही भागात दौरेही केले. बसपाचे डॉ.दत्ता धनवे यांनीही धावता दौरा केला. अपक्ष संदेश चव्हाणही अधून-मधून दिसत आहेत.
या मतदारसंघात शिवसेनेलाच कायम आघाडी मिळाल्याचे मागील पंधरा वर्षांतील आकडेवारी सांगते. मागच्या वेळी सातव निवडून आले तरीही येथे काँग्रेस मागेच होती. हा कलंक पुसून काढण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे. काँग्रेस व सेना दोन्हींच्या कार्यकर्त्यांत मात्र कोणताच उत्साह नाही. उमेदवार बाहेरचा हीच नाराजी दोन्हींकडे आहे. मात्र लढत या दोघांतच आहे, अशी विचित्र स्थिती येथे दिसते.