चारवेळा निवेदन देऊनही नगर परिषद करतेय कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:35+5:302021-07-15T04:21:35+5:30
हिंगोली : बसस्थानकात येणाऱ्या मोकाट गुरांमुळे प्रवाशांना तर त्रास होतोच आहे. त्याचबरोबर चालकांना बस वळविताना त्रास होतो आहे. मोकाट ...
हिंगोली : बसस्थानकात येणाऱ्या मोकाट गुरांमुळे प्रवाशांना तर त्रास होतोच आहे. त्याचबरोबर चालकांना बस वळविताना त्रास होतो आहे. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा या संदर्भात नगर परिषदेकडे चार वेळा पत्रव्यहार केला. परंतु, दखल न देता नगर परिषद कानाडोळा करीत आहे, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कित्येक महिन्यांपासून नवीन बसस्थानकाचे काम रखडले आहे. नवीन बसस्थानकाला मुहूर्त अजूनही लागेना झाला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्राच्या शेडमध्ये बसस्थानक उभारले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. थोडा जरी पाऊस पडला की बसस्थानकात पाणी साचून चिखल होऊन बसतो. बसस्थानकाला संरक्षण भिंत नसल्यामुळे मोकाट जनावरे बसस्थानकात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकात मध्यभागी मोकाट गुरे ठाण मांडून बसत असल्यामुळे चालकाला बसेस वळविता येत नाहीत.
बसस्थानकात येणाऱ्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, यासाठी एस. टी. महामंडळाने चार वेळा नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापतरी एकाही पत्राची दखल नगर परिषदेने घेतली नाही, असेही महामंडळाचे म्हणणे आहे.
मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा...
कोरोना महामारीमुळे आधीच सर्वजण त्रासले आहेत. अजूनही ग्रामीण भागातील बसेस सुरू झाल्या नाहीत. लांब पल्ल्यांच्या बसेसवरच महामंडळाच्या उत्पन्नाचा भार आहे. सद्य:स्थितीत महामंडळाकडे स्वच्छतेकरिता एकच सफाई कामगार आहे. ही सर्व बाजू लक्षात घेऊन नगर परिषदेने कोंडवाडा तयार करून बसस्थानकात येणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करावा एवढीच आमची मागणी आहे.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख
फोटो १४