भाजीपाल्यांची आवक असूनही भाजीपाला महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:28 AM2021-05-17T04:28:30+5:302021-05-17T04:28:30+5:30
हिंगोली: जिल्ह्यात पाण्याची मुबलता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादनही घेतले आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला आवक चांगली असली तरी ...
हिंगोली: जिल्ह्यात पाण्याची मुबलता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादनही घेतले आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला आवक चांगली असली तरी मंडईतील काही विक्रेत्यांनी भाज्यांचा ढिग केलेला पहायला मिळत आहे. परिणामी भाज्या महाग झाल्याचे पहायला मिळाले.
जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरु केले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वेळेतच भाजीपाला व इतर किराणा दुकान चालू ठेवावे, असे आदेशित केले आहे. परंतु, भाजीपाला विकण्यासाठी वेळ कमी पडत आहे, असे भाजीपाला विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेली वेळ कमी असून ती वाढवून देवून गल्लोगल्ली भाजीपाला विकण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही काही व्यापाऱ्यांनी केली आहे. कांदा,लिंबू,कोथिंबीर,कद्दू, पालक सोडले मंडईत काकडी ३० रुपये किलो, टोमॅटो ४०, वांगे ३० रुपये, आद्रक ४० रुपये, भेंडी ४०, दोडके ३० तर कद्दू १० रुपये किलो दराने विकले गेले.
विक्रीअभावी भाज्यांचा ढिग
भाजी मंडईत सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान बीट होते. सर्व छोटे-मोठे व्यापारी येथे शेतकऱ्यांनी आणलेल्या भाज्या खरेदीसाठी येतात. ठोक विक्रेते आधी भाज्या खरेदी करतात नंतर छोट्या व्यापाऱ्यांना भाज्या विक्री केल्या जातात. परंतु, २५ एप्रिलपासून मंडईतील व्यापाऱ्यांना भाजी विकण्यासाठी ११ वाजेची वेळ दिल्यामुळे भाज्यांचा ढिग साचत आहे. काही ठोक विक्रेते भाज्यांचा स्टॉक करुन ठेवतात. त्यामुळे छोट्या विक्रेत्यांना भाज्या वेळेवर मिळत नाहीत. आलेल्या पाऊली त्यांना परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला सर्वच व्यापाऱ्यांना मिळावा यासाठी ठोक विक्रेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी काहींनी केली.
प्रतिक्रिया
भाज्यांची आवक चांगली असली
आम्ही छोटे व्यापारी ठोक विक्रेत्यांकडून खरेदी करतो. या आठवड्यात भाजीपाला महाग मिळाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हालाही महागच विकावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने छोट्या विक्रेत्यांनाही जास्तीचा वेळ द्यावा.-शेख इरफान, भाजी विक्रेता
जिल्ह्यात फळांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, विकण्यासाठी वेळ व जागा नाही. कोरोनामुळे सकाळी ११ वाजेपर्यतच फळे विकावे लागत आहेत. कोणत्याही वेळी फळे विकल्यास दंड भरावा लागत आहे. सद्य:स्थितीत चिकू ६० रुपये किलो, अंगूर १२० रुपये, सफरचंद २२०, पपई, डाळिंब २०० रुपये किलो तर नारळ ६० रुपयास एक या प्रमाणे विक्री झाले.
- शेख अब्दुल बागवान, फळ विक्रेता