तक्रारींनंतरही प्रज्ञा सातवच विधान परिषद उमेदवार
By विजय पाटील | Published: July 1, 2024 10:13 PM2024-07-01T22:13:37+5:302024-07-01T22:16:55+5:30
- विजय पाटील हिंगोली : मागील काही दिवसांपासून काँग्रेस व शिवसेना उबाठाच्या वतीने सातत्याने आ. प्रज्ञा सातव यांनी लोकसभेच्या ...
- विजय पाटील
हिंगोली : मागील काही दिवसांपासून काँग्रेस व शिवसेना उबाठाच्या वतीने सातत्याने आ. प्रज्ञा सातव यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काम केले नसल्याच्या तक्रारी होत होत्या. तरीही काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांनाच विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने त्यांच्या राजकीय विरोधकांना चांगलीच चपराक बसली आहे. तर पुन्हा गटातटाच्या राजकारणाला वेग येणार असल्याचे दिसत आहे.
हिंगोली लोकसभेची निवडणूक लढण्यास डॉ. प्रज्ञा सातव इच्छुक होत्या. त्यांनी तयारीही सुरू केली होती. त्यांचे पती राजीव सातव या मतदारसंघात खासदार राहिले होते. त्यामुळे त्यांनी जोरदार दावा केला. मात्र आघाडीत ही जागा शिवसेना उबाठा गटाला सुटली. आता त्यांनी विधानसभेची तयारी चालविली होती. कळमनुरीच्या जागेवर त्यांचा दावा होता. मात्र तेथे शिवसेना उबाठाही दावा करीत आहे. त्यामुळे पुन्हा संघर्षाची चिन्हे होती. त्यातच निवडणूक होऊन दीड महिन्याचा काळ लोटल्यानंतर सातव यांच्याविषयी काँग्रेसच्या गोटातूनच पहिली तक्रार झाली. यावरून सुपारी घेऊन तक्रारीचे आरोपही होत होते.
काँग्रेसमधूनच तक्रार झाल्याने शिवसेना उबाठाचे नवनिर्वाचित खा. नागेश आष्टीकर यांनीही पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार केली होती. सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. तर चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्यानंतर सातव यांनी विधान परिषदेसाठीच आणखी जोर लावला. त्यात त्या यशस्वीही झाल्या आहेत.
काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर केली. तर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने ही उमेदवारी जाहीर केल्याचे म्हटले. राज्यातील काँग्रेस आमदारांचे संख्याबळ पाहता सातव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सातव या पुन्हा आमदार झाल्यानंतर हिंगोलीतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. गटातटाच्या राजकारणात सातव यांना पाण्यात पाहणाऱ्यांना मात्र ही चपराक मानली जात आहे.