‘विद्यार्थ्यांच्या मुलभूत संकल्पना विकसित करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:28 PM2018-02-08T23:28:44+5:302018-02-08T23:33:13+5:30
वर्गातील प्रत्येक मुलांच्या प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना विकसीत करा, राज्यातील प्रत्येक मुल प्रगत करण्यासाठी सहकार्य करा, १०० टक्के मुले प्रगत करा, असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वर्गातील प्रत्येक मुलांच्या प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना विकसीत करा, राज्यातील प्रत्येक मुल प्रगत करण्यासाठी सहकार्य करा, १०० टक्के मुले प्रगत करा, असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.
शिक्षण विभाग व डाएटच्या वतीने जि.प. प्रशालेच्या मैदानावर प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमात शिक्षक सुसंवाद कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, डी.के. इंगोले, शिक्षण तज्ज्ञ सिद्धेश वाडकर, श्याम मकरमपुरे, प्राचार्य गणेश शिंदे, गट शिक्षणाधिकारी आर.आर. पातळे, दत्ता नांदे, जगताप आदी उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले, गणित विषयाकडे आमचे लक्ष नाही, गणिताची भिती का? वर्गात मोजके बोला विद्यार्थ्यांना सर्व संकल्पना समजण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवा, शैक्षणिक साहित्याचा वापर करा, गणिताची एखादी मुलभूत क्रिया न येताच मोठे अधिकारी होता येते हे उदाहरणासह त्यांनी पटवून दिले. पहिली, दुसरीतच विद्यार्थ्यांच्या मुलभूत संकल्पना विकसित करा, गुणवत्ता ७५ टक्के येणे याला गुणवत्ता म्हणत नाहीत. विद्यार्थ्यांनी विषयातील संकल्पना समजल्यानंतर आपोआपच गुणवत्ता १०० टक्के येते. चौथ्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के मुलभूत संकल्पना आलीच पाहिजे. पहिली, दुसरीत मुलगा कच्चा राहिला तर आयुष्यात तो कच्चाच राहतो. अधिकाºयांनी मार्गदर्शकांची नाही तर सुलभकांची भूमिका स्वीकारली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी शैक्षणिक अॅप उर्दु नजमेचे अनावरण झाले. शाळेतील गुणवत्तेचे सादरीकरण केशव खटींग, देविदास गुंजकर यांनी केले. सुसंवाद कार्यक्रमात नंदकुमार यांनी मोकळ्या मनाने शिक्षकांशी संवाद साधला. गुणवत्तेत राज्याला देशात प्रथम क्रमांकावर आणण्याचे ध्येय आहे. अनेक देशात १०० टक्के मुले प्रगत आहेत. आपल्या राज्यातही असे झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षक ताटकळले
साडेबारा वाजता सचिव नंदकुमार हे कार्यक्रमाला येणार होते. प्रत्यक्षात ते साडेतीनला आले. त्यामुळे शिक्षक बाहेरच फिरू लागल्याने त्यांच्या मागे फिरण्याची कवायत शिक्षणाधिकारी करीत होते. तर मंडपही अपुरा पडल्याने अनेकांना उभे राहूनच मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा लागला. सेल्फी काढण्याची धडपड एवढी की, नंदकुमार हे कोणत्या मार्गाने येणार यावरूनच गोंधळाचे वातावरण होते.