'हर हर महादेव' च्या जयघोषात भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन
By विजय पाटील | Published: March 8, 2024 11:41 AM2024-03-08T11:41:41+5:302024-03-08T11:42:33+5:30
पहाटे चार वाजल्यापासून आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे.
हिंगोली: हर हर महादेव, नागनाथ महाराज की जय, शंभो हर हर, असे म्हणत असंख्य भाविकांनी आज महाशिवरात्री निमित्त आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. पहाटे एक वाजता आमदार संतोष बांगर, तहसीलदार हरीश गाडे, मंदिर मंदिर संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री नागनाथाची महापूजा करण्यात आली. यानंतर नागनाथाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले.
आज महाशिवरात्री निमित्त मराठवाड्यासह इतर राज्यांतील भाविक श्री नागनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. आज रात्री आठ वाजता नागनाथाची पालखी निघणार आहे.
८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस निरीक्षक जी.एस. राहीरे, संस्थांचे अधीक्षक वैजनाथ पवार,व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, बालाजी महाजन, उपनिरीक्षक किशोर पोटे, गार्ड प्रमुख बबन सोनवणे आदींनी भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे.