भरवशाच्या रुग्णवाहिका झाल्या ‘ढकलस्टार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:24 AM2018-01-28T00:24:26+5:302018-01-28T00:24:30+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार अनेक दिवसांपासून ढेपाळलेला आहे. येथे कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्याने की काय? येथील जननी शिशु योजनेतील भरवशाच्या असलेल्या रुग्णवाहिकांना धक्का दिल्याशिवाय सुरुच होत नसल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पहावयास मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार अनेक दिवसांपासून ढेपाळलेला आहे. येथे कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्याने की काय? येथील जननी शिशु योजनेतील भरवशाच्या असलेल्या रुग्णवाहिकांना धक्का दिल्याशिवाय सुरुच होत नसल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पहावयास मिळाला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ढेपाळलेल्या कारभाराने मागील काही दिवसांपासून रुग्ण हैराण झाले आहे. या ठिकाणी वरिष्ठांचा जराही वचकच राहिलेला नसल्याने येथे कार्यरत असलेले अधिकारी - कर्मचारी, बहुतांश परिचारिका त्यांच्या मनाला वाटेल तसे कार्य बजावत आहेत. रुग्णांवर धावून जाणे ही तर नित्याचीच बाब आहे. ती वरिष्ठांच्या कानावर अनेकदा घालूनही त्यात जराही बदल झालेला नाही. तर विशेष बाब म्हणजे जननी शिशु योजनेंतर्गत प्रसूती मातांना घरापासून नेआण करण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकाही भंगार झाल्या आहेत. या रुग्णवाहिकांची एवढी भयंकर स्थिती आहे की, कुठे बंद पडतील आणि कोणत्या चढाला मोसम तोडतील याचा काही नेमच नाही. रुग्णवाहिका बंद पडली तर तेथेच प्रसुती होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यातच या रुग्णवाहिकांवरील चालकांना अद्याप कायमच केलेले नसल्याने त्यांनाही रात्री-अपरात्री रुग्ण ने-आण करण्यात तेवढा रस उरत नसल्याचे चित्र आहे. तसेच नोंदणी कक्षात रजिस्टरसह चालक गायब होत असल्याने या ठिकाणी अनेकदा प्रसूती झालेल्या मातांना ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नाही.