‘तो’ जीवघेणा खड्डा बनला धोबीघाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:31 AM2018-08-26T00:31:04+5:302018-08-26T00:31:31+5:30

जिल्हा रुग्णालयात पाणी नसल्याने तेथील बाळंतणीसह इतर अनेक रुग्णांचे कपडे धुण्यासाठी चक्क जिवघेण्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात महिला उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याहून धक्कादायक म्हणजे याच खड्ड्यात पडून दोन महिन्यांपूर्वी एका बालकाचा मृत्यू झाला होता.

 Dhobi Ghat became a fatal pit | ‘तो’ जीवघेणा खड्डा बनला धोबीघाट

‘तो’ जीवघेणा खड्डा बनला धोबीघाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा रुग्णालयात पाणी नसल्याने तेथील बाळंतणीसह इतर अनेक रुग्णांचे कपडे धुण्यासाठी चक्क जिवघेण्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात महिला उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याहून धक्कादायक म्हणजे याच खड्ड्यात पडून दोन महिन्यांपूर्वी एका बालकाचा मृत्यू झाला होता.
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय असुविधांचे माहेरघर आहे. केवळ नाईलाज म्हणून रुग्ण तेथे येतात. गोरगरिबांना तर खिशात पैसे नसल्याने या रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. येथे पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहातही पाण्याची सोय नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. केवळ मलमपट्टी करून प्रशासन दिवस काढते.
डॉक्टरांसाठीच्या स्वच्छतागृहातही पाणी नसते. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकारीही कधी याबाबत कुरबूर करीत नाहीत. पाण्यासाठी टाक्या आहेत. स्वच्छतागृहे आहेत. पाईपलाईन आहे, दुष्काळी चित्र नाही. मात्र तरीही रुग्णालयात पाणीप्रश्न असेल तर हे कोडे ब्रह्मदेवही सोडवू शकणार नाही. अधिकाऱ्यांनाच ही बाब मनावर घ्यावी लागणार आहे.
रुग्णालयासमोरील रस्त्यावर भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेला खड्डा २५ ते ३0 फूट खोल आहे. यात एक बालक पडून मृत्यू पावल्यानंतर दोन्ही बाजूंनी पत्रा लावून हा रस्ता बंद केला. मात्र तरीही त्यात जावून रुग्णालयात आलेल्या ग्रामीण भागातील महिलांनी बाळ व बाळंतणीचे कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग सुरू केला आहे. येथे इतरही रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागतात. वाळू घातलेल्या कपड्यांवरून ते लक्षात येते. मात्र त्यांना कुणीच अडवत नाही. या खड्ड्याच्या खोलीबाबतही त्यांना काहीच कल्पना नाही. रुग्णालयात पाणी नाही व येथे चांगले पाणी दिसते म्हणून आम्ही येथे आल्याचे या महिला सांगतात.
रुग्णालयात पाणी नाही, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांचा आहे. तो सुटत नाही याला जबाबदार कोण? या साध्या व सोप्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर हा पाणीप्रश्न नक्कीच सुटू शकेल. मात्र हे विचारायची जबाबदारीच स्वीकारणारा खांदा या संपूर्ण जिल्ह्यात कुणाचाच नसल्याने हा प्रश्न खितपत पडला आहे.
एका बालकाचा बळी गेल्यानंतर त्यावरून मोठे काहूर माजले होते. कंत्राटदार, जीवन प्राधिकरण व नगरपालिका यापैकी कुणीही त्यातून बोध घेतला नाही. पत्रे ठोकून रस्ता बंद केला. मात्र तेथे धुणे धुणाºयांच्या लागणाºया रांगा का दिसत नसतील?
इमारतीचे मजले जसे वाढताहेत तशा गैरसोयीही वाढत आहेत. पाण्यासारखा पायाभूत प्रश्न सुटत नसेल तर हे मजले आणि वाढलेल्या खाटांचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Web Title:  Dhobi Ghat became a fatal pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.