धूम स्टाईल थरार! पैश्यांची बॅग, सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 21, 2023 06:57 PM2023-03-21T18:57:15+5:302023-03-21T18:58:57+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; सोन्याची चैन व पैलुटारू सावरखेडा, खानापूर मार्गे कळमनुरीकडे वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने त्या दिशेने धाव घेत पाठलाग केला.शाची बॅग केली होती लंपास
हिंगोली : धूम स्टाईलने गळ्यातील सोन्याची चैन व पैशाची बॅग घेऊन दुचाकीवरून पळ काढणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच वेगाने गाठत पकडले. हा थरार २० मार्च रोजी दुपारी घडला.
हिंगोली शहरात २० मार्च रोजी करण भीमराव मुळे (रा.चौंडी काठोडा ता. औंढा) हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. ते भारत विद्यालयाजवळ आले असता दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच रेल्वे स्टेशन परिसरातील रोडवरून जाणाऱ्या शेख सोहेल शेख चाँदपाशा (रा. हिंगोली) यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याची चैन हिसकावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दरम्यान, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी लुटारूंचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी यातील एक लुटारू सावरखेडा, खानापूर मार्गे कळमनुरीकडे वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने त्या दिशेने धाव घेत पाठलाग केला. तसेच पुढे कळमनुरी पोलिसांनाही सूचना दिल्या होत्या. दोन्ही पथकाने सुशिल बबन वाकळे (रा. बासंबा) यास ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता दोन्ही घटनेत सहभाग असल्याचे त्याने कबुली दिली. तसेच यात संतोष शंकर जाधव, आशुतोष निळकंठ ढाले (सर्व रा. बासंबा) यांचा सहभाग असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून इतर दोघांना पोलिसांनी कारवाडी भागातून ताब्यात घेतले.
१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
यावेळी पोलिसांनी आरोपीकडून रोख २६ हजार २०० रूपये, एक मोबाईल व एक दुचाकी असा एकूण १ लाख ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, आजम प्यारेवाले, प्रमोद थोरात, शेख जावेद यांच्या पथकाने केली.