धुलीवंदनाची पार्टी जीवावर बेतली; शेततळ्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:27 PM2020-03-12T18:27:51+5:302020-03-12T18:30:41+5:30
धूलिवंदनानिमित्त एका मित्राच्या शेतात जेवणाच्या पार्टीसाठी आले होते.
कुरुंदा (जि.हिंगोली) : धूलिवंदनाच्या दिवशी पार्टी करण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी अनिल ऊर्फ चिंकू बबन खरे (२५, रा. खोबरागडेनगर, नांदेड), अवधूत आबागौंड कौयलवाड (२४, रा. पौर्णिमानगर नांदेड) या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास वसमत तालुक्यातील बागल पार्डी येथे घडली.
नांदेड जिल्ह्यातील हे महाविद्यालयीन तरुण एकमेकांचे मित्र असल्याने धूलिवंदनानिमित्त एका मित्राच्या शेतात जेवणाच्या पार्टीसाठी आले होते. सहा जण शेतात धुलीवंदन साजरे करीत असताना दुपारच्या उन्हात शेततळ्यात पोहण्याचा मोह चौघांना आवरला नाही. पॉलिथिन अस्तर असलेल्या या शेततळ्यात चांगलाच पाणीसाठा आहे. या चौघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय पोहताही येत नव्हते. जास्त खोल पाणी असल्याने ते गटांगळ्या खात होते. तेव्हा बाहेर असलेल्या दोघांनी ठिबकच्या नळ्या आत टाकून दोघांना वाचविले. मात्र इतर दोघे बुडाल्यानंतर वर आलेच नाहीत. या घटनेत अनिल ऊर्फ चिंकू बबन खरे व अवधूत आबागौंड कौयलवाड या दोघांचा मृत्यू झाला. घटना घडलेले शेत बा. पार्डी- रेडगाव रस्त्याजवळ होते. घटनास्थळी सपोनि. गोपीणार, जमादार केंद्रे, लांडगे, भोपे, जोगदंड, सोनुने आदींनी पंचनामा केला. शवविच्छेदन वसमतच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आले. राजूआप्पा नरवाडे (रा. बागल पार्डी) यांच्या माहितीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दोन तास प्रयत्न
मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यासाठी जवळपास दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. वसमतच्या अग्निशामक दलाच्या वाहनास पाचारण करण्यात आले. गावकऱ्यांच्या प्रयत्नांतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.