जिल्ह्यातील हिरकणी कक्षांचा वापर बंदच, गोदाम म्हणून होतोय वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:37+5:302021-01-03T04:30:37+5:30

प्रवास करताना सोबत असलेल्या लहान मुलांना स्तनपान करताना महिलांची कुचंबणा होते. कित्येकदा तासन्तास बसस्थानकात बसून एसटीची वाट पाहताना उघड्यावर ...

The diamond cells in the district are being used as warehouses | जिल्ह्यातील हिरकणी कक्षांचा वापर बंदच, गोदाम म्हणून होतोय वापर

जिल्ह्यातील हिरकणी कक्षांचा वापर बंदच, गोदाम म्हणून होतोय वापर

Next

प्रवास करताना सोबत असलेल्या लहान मुलांना स्तनपान करताना महिलांची कुचंबणा होते. कित्येकदा तासन्तास बसस्थानकात बसून एसटीची वाट पाहताना उघड्यावर स्तनपान करणे अडचणीचे होते. राज्य परिवहन महामंडळाने मातांची ही अडचण पाहता प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन केले. स्वतंत्र कक्षात मातांना बसण्यासाठी हिरकणी कक्षात पिण्याचे पाणी, पंखे व इतर व्यवस्था करण्याचे आदेशित केले होते. अंमलबजावणी म्हणून वसमत बसस्थानकावर हिरकणी कक्षाचा फलक लावला. वास्तविक हा कक्षच गैरसोयीच्या जागेत आहे. छतावर जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांखाली स्थापन केला; मात्र माता महिलांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी कोणत्याच उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. गेट कायम कुलूपबंदच असते. या कक्षात भलताच पसारा टाकणे सुरू झाले आहे. भंगाराची खोली म्हणून वापर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.

या संदर्भात आगार प्रमुख आर.वाय. मुपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हिरकणी कक्षाबाबत कानावरच हात ठेवले. कक्ष कधी स्थापन झाला हे माहीत नाही, कधी वापर होतो का हे विचारले असता ते म्हणाले आम्ही नोंद ठेवत नाही. हिरकणी कक्षाची चाबी महसूल नियंत्रणाकडे असते महिलांनी वापरण्यासाठी मागितले तर चाबी देत असतो असे त्यांनी सांगितले.

हिंगोलीतील कक्षच माहिती नाही

हिंगोली येथील बसस्थानकाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होईल माहिती नाही. मात्र त्यामुळे येथे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आगारात एक अडगळीची खोली तूर्त तरी हिरकणी कक्ष म्हणून दिलेली आहे. मात्र ती नुसती नावालाच आहे. जेव्हापासून दिली तेव्हापासून कधी उघडली असेल, असे खोलीच्या प्रवेशद्वारासह परिसराची कळा पाहताच लक्षात येते.

कळमनुरीच्या हिरकणी कक्षाला कुलूप

कळमनुरी: येथील एसटी बसस्थानकात हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे. हा कक्ष सध्या कुलूपबंद दिसत आहे. या कक्षाची फार दुरवस्था झालेली असून साफसफाई होत नाही. धूळ साचलेली आहे. २ जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता भेट दिली असता कक्ष कुलूपबंद दिसून आला. स्तनदा मातांना आपल्या लहान मुलांचे स्तनपान करण्यासाठीचा हा कक्ष नावालाच आहे.

औंढ्यातही कक्ष फक्त फलकापुरताच

औंढा नागनाथ : येथील नवीन बस स्थानकात मागील एक वर्षापासून हिरकणी कक्ष स्थापन केला आहे या ठिकाणी पूर्वी पोलीस चौकी असायची; परंतु आता एका वर्षापासून हिरकणी कक्ष असे नाव देण्यात आले आहे. या कक्षात एकाही महिलेने आतापर्यंत स्तनपान केल्याचे आढळून आले नाही. त्याची अवस्था दयनीय असून नेहमीच धूळ साचलेली असते. त्याचप्रमाणे स्तनपान करण्यासाठी महिलांना बसण्याची कुठलीही व्यवस्था नाही. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग ठिकाण असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दररोज या बसस्थानकात हजार ते दोन हजार च्यावर प्रवासी ये-जा करतात. राज्यातील सर्वच प्रमुख शहराला जोडणारे हे बसस्थानक असून या ठिकाणी मोठी वर्दळ असते. असे असतानाही हिरकणी हिरकणी कक्षात कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही.

Web Title: The diamond cells in the district are being used as warehouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.