'तो मरेल असे वाटले नव्हते'; दारू पिण्यास मज्जाव केल्याने पित्याने रागाच्या भरात मुलास संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 07:09 PM2022-05-27T19:09:49+5:302022-05-27T19:12:39+5:30
मुलगा दारू पिण्यास मज्जाव करत असल्याने वादातून त्याचा खून केल्याची कबुली बापाने दिली.
कळमनुरी (हिंगोली ): तालुक्यातील गौळ बाजार येथील शेतशिवारात 21 मे रोजीच्या मध्यरात्री एका 20 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना घडली होती. या खुनाचा उलगडा झाला असून जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाचा खून केल्याचे पुढे आले आहे.
तालुक्यातील गौळबाजार येथे देवानंद संतोष मुधोळ याचा खून केल्याची घटना २१ मे रोजी उघडकीस आली होती. मृताचा भाऊ शिवम मुधोळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनी सुनील निकाळजे यांनी भेट देत अधिक तपासाच्या दृष्टीकोनातून सूचना केल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून कसून तपासानंतर सपोनि श्रीनिवास रोयलावार, फौजदार के एस सोनूले, जमादार भारत घ्यार यांनी खुनाचा उलगडा करत मृताच्या बापाला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्या असता मुलगा दारू पिण्यास मज्जाव करत असल्याने वादातून त्याचा खून केल्याची कबुली बापाने दिली.
दारू पिण्यास मज्जाव केल्याने होत वाद
देवानंद हा मागील दोन वर्षापासून चांगल्या प्रकारे शेती करून उत्पन्न मिळवित होता. वडील संतोष मुधोळ यास दारूचे व्यसन होते. यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत असत. २१ मे रोजी देखील बापलेकात वाद झाले. यातून बापाने संतोषला लाकडी दांड्याने मारहाण सुरु केली. संतोष जीवाच्या आकांताने ओरडत राहिला पण घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतोष मुधोळ घरी जाऊन झोपले. पोलिसांनी ताब्यात घेल्यानंतर मारहाणीत मुलाचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते असे म्हणत त्याने गुन्हाची कबुली दिली.