आरटीओ आणि वाहतूक शाखेचे वेगमर्यादेचे वेगवेगळे नियम; वाहनचालकांना बसतोय दंडाचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 06:49 PM2020-12-04T18:49:59+5:302020-12-04T18:55:26+5:30
स्पीडगनच्या माध्यमातून ताशी ७१ ते ७८ किमी वेगाने धावणाऱ्या वाहनांनाही ऑनलाईन दंडाची पावती मिळत आहे.
हिंगोली : आरटीओ कार्यालय व पोलीस वाहतूक शाखेकडून वेगवेगळे नियम लावले जात असल्याने वेगमर्यादा ओलांडल्याने स्पीडगनच्या माध्यमातून अनेक वाहनचालकांना दंडाचा भूर्दंड सोसावा लागत असल्याचा प्रकार समोर येत आहे. दोन्ही विभागांत मतैक्य व्हावे अथवा जागृतीसाठी फलक लावावेत, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
केंद्रिय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार २०१७ पासून पिवळ्या नंबर प्लेटच्या३५०० किलोपेक्षाकमी वजन असणाऱ्या कॅब, काळीपिवळी टॅक्सी, अॅप बेस्ड कॅब, टेम्पो, पीकअप व्हॅनला ताशी ८० किलोमीटरची वेगमर्यादा आहे. तर या वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक आहे. त्यामुळे ८० किमीपेक्षा जास्त वेग गाठता येत नाही. तरीही स्पीडगनच्या माध्यमातून ताशी ७१ ते ७८ किमी वेगाने धावणाऱ्या वाहनांनाही ऑनलाईन दंडाची पावती मिळत आहे. जिल्ह्यात वाशिम, बारड महामार्ग व हिंगोली वाहतूक शाखा अशा तीन वाहनांद्वारे स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यात अनेकदा शासकीय वाहनांवरही दंडाची कारवाई होत आहे. आतापर्यंत हजारो वाहनांना असा दंड आकारला गेला आहे. त्यामुळे लाखोंचा दंड बसला आहे.
याबाबत औरंगाबाद टुरिझम अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांची पिवळी क्रमांक प्लेट असलेल्या एमएच २०ईजी३२८९ ही कार नांदेड येथे प्रवासी घेऊन जात असताना वसमत ग्रामीण भागात ७८ किमी ताशी वेगासाठी दंडाची पावती मिळाली आहे. त्याचा फोटो स्पीडगनच्या वेगाच्या तपशिलासह पावतीत मिळाला आहे. मात्र आरटीओने ताशी ८० किमीची वेगमर्यादा दिल्यावर हा प्रकार कसा घडतो, असा त्यांचा सवाल आहे. याबाबत आरटीओ अनंत जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, ट्रान्सपोर्टच्या वाहनांसाठी वेगमर्यादा ताशी ८० किमीची ठरवून दिली असून ज्वलनशील पदार्थांच्या टँकरसाठी ४५ किमीची आहे. आम्ही त्यापुढील वेगासाठी दंड आकारतो. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे म्हणाले, वाहनधारकांच्या अशा तक्रारी असतील तर स्पीडगनच्या वेगमर्यादेबाबत नव्याने सेटिंग्ज करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याबाबत पुढील कार्यवाही करण्याचा प्रयत्न राहील.
सुरक्षा नाही, दंड तेवढा आकारतात
मराठवाड्यासह विविध भागात वाहनचालकांचे आरोग्य व वाहनांसाठी कोणतीच सुरक्षा नाही. अनेक रस्तेही खराब आहेत. वर्षाकाठी ८ हजार आरटीओ तर अडीच हजार प्रोफेशनल टॅक्स भरावा लागतो. तरीही वेगमर्यादेच्या नियमांतील गोंधळामुळे पुन्हा हजाराचा प्रत्येक फेरीला फटका सोसावा लागतोय. कोरोनाने अडचणीत सापडलेल्या या व्यवसायाला आणखी डुबवायचे काम केले जात आहे
-विनाेद पाटील, औरंगाबाद टुरिझम अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन
शासनाच्या नव्या नियमांप्रमाणे स्पीडगनला रस्तानिहाय वेगमर्यादेची वेगेवेगळी मानके दिली आहेत. त्याचा भंग झाला तरच स्पीडगन ऑटोमॅटिक दंड आकारून अपलोड करते. त्यात वाहनचालकांना फलक लावून माहिती देण्याचे काम मात्र रस्त्याची जबाबदारी असलेल्या बांधकाम विभागाने केले पाहिजे. - ओमकांत चिंचोलकर,सपोनि, वाहतूक शाखा