दिलीप कांबळेंनी केली तूर खरेदीची पाहणी
By admin | Published: May 26, 2017 01:46 PM2017-05-26T13:46:43+5:302017-05-26T13:46:43+5:30
तूर खरेदीची पाहणी: एका शेतकºयाला भाजपच्या खात्यातून मदत, इतरांचे प्रश्न कोण सोडविणार?
Next
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 26 - शेतकरी संवाद कार्यक्रमात जिकडे-तिकडे शेतीमालाचा भाव, तूर खरेदी हे प्रश्न ऐकून कान पिकले म्हणून की काय पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी मोंढ्यात भेट दिली. तेथेही आमचा माल कधी खरेदी होणार? घरी लग्न आहे, पैसे द्यायला सांगा, अशा प्रश्नांनी त्यांना भांडावून सोडले.
त्यातील एकाच्या भाचीचे लग्न ३१ मे रोजी असल्याने त्याचे पैसे आल्यावर वळती करून घेण्याच्या अटीवर भाजपाच्या खात्यातून पैसे देण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले. हिंगोली जिल्ह्यात तूर खरेदीचा प्रश्न चांगलाच चिघळला होता. तेव्हा प्रथम काँग्रेसच्या मंडळीने आंदोलन केले. सुरू झालेले केंद्र काही दिवसांनी बंद पडले. पुन्हा विरोधकांनी निवेदने दिली.
पुन्हा ३१ मेपर्यंत नोंदणी करण्याच्या अटीवर केंद्र सुरू करण्यास भाग पाडले. तरीही सत्ताधारी भाजपचे कोणीही फिरकले नव्हते. खरेदी-विक्री संघाकडून खरेदीचे नियोजन केल्यावर आ.तान्हाजी मुटकुळे तेथे गेले होते.
आज पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा.शिवाजी माने, माजी खा.सुभाष वानखेडे यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हजर होते. यावेळी बाजार समिती सभापती रामेश्वर शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, सचिव जब्बार पटेल यांचीही उपस्थिती होती.
यावेळी कांबळे यांनी तूर खरेदी केंद्रात सुरू असलेल्या चाळणीची पाहणी केली. त्यानंतर काही शेतक-यांनी त्यांना गराडा घातला. ताकतोडा येथील सावके नामक शेतक-याने नाफेडने मोजणी केलेल्या तुरीच्या धनादेशासाठी पंधरा दिवसांपासून खेटे घालत असल्याचे सांगितले.
३१ रोजी भाचीचे लग्न असल्याने पैशांची अत्यंत गरज असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. तर अन्य एक शेतकरी म्हणाला, साहेब तुरीची नोंदणी तर केली मात्र मेसेजच येत नाही. आता पेरणीचे दिवस येत आहेत. कधीच्या मालाची मोजणी सुरू आहे, हेही कळत नाही. तर पावसाळ्यात मेसेज येवूनही काय फायदा? त्यावर पालकमंत्र्यांनी तुमची तूर खरेदी केली जाईल, एवढेच आश्वस्त केले. आमची २२ तारखेपासूनची तूर असूनही घेत नाहीत, शेडमध्ये असलेल्या तुरीचेही क्रमांक मागेपुढे होत आहेत, अशा अनेक तक्रारी शेतकरी मागाहून सांगत होते. मात्र दखल कोण घेतेय?
तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करू
बाजार समितीच्या कार्यालयात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नाफेडने ३४ हजार तर संघाने ६ हजार क्विंटल तूर खरेदी केली. ज्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली नाही, त्यांनी आताही ती करून घ्यावी. शासन तुरीचा शेवटचा दाणाही खरेदी करेल.
शेतक-यांनी काळजी करण्याचे कारण नाही. शेतक-यांनी नोंदणी केल्यावर त्यांना पोहोच अथवा मेसेजही मिळाला नसल्याने चिंता असल्याचे पत्रकारांनी सांगितल्यावर कांबळे यांनी बाजार समितीने ती व्यवस्था करण्यास बजावले. तर जिल्ह्यातील परिस्थितीविषयी मात्र ते अनभिज्ञ होते. तर खरेदीची सरासरी पाहता आता बाहेरच्या शेतक-यांना मेसेज जाणे अपेक्षित आहे.
मात्र तसे होत नसल्याचे विचारल्यावर कोणतीही गडबड न होता शेतक-यांची तूर खरेदी केली जाईल, असे ते म्हणाले. तर सभापती शिंदे यांनीही यात जुन्या व नव्या नोंदणीचा मेळ घालून अजून शेडमधील मालच संपला नसल्याचे सांगितले.