मित्रत्वाचा गैरफायदा; दाम दुप्पटच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 07:24 PM2021-02-03T19:24:53+5:302021-02-03T19:25:08+5:30
या दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. यातून ज्ञानेश्वर जाधव यांनी संतोषला दाम दुप्पट पैसे करून देतो, असे पटवून दिले.
शिरडशहापूर (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील चोंडी बहिरोबा येथे दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एकाची ५ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोंडी बहिरोबा येथील संतोष बालाजी जाधव (३०) हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची ओळख सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील ज्ञानेश्वर नारायण जाधव यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. यातून ज्ञानेश्वर जाधव यांनी संतोषला दाम दुप्पट पैसे करून देतो, असे पटवून दिले. त्यानंतर दामदुप्पटचा भूलभुलैया सुरू झाला.
संतोष जाधव यांनी ११ जानेवारी रोजी चोंडी बहिरोबा येथे २ लाख रुपये नगदी दिले. उर्वरित ३ लाख रुपये औरंगाबादला देण्याचे ठरले. यानुसार संतोष व त्यांच्या एका मित्राने २९ जानेवारी रोजी ३ लाख रुपये घेऊन गेले. ज्ञानेश्वर यांनी औरंगाबाद येथील जटवाडा रोड या ठिकाणी बोलावून घेतले. त्यावेळी ज्ञानेश्वर व इतर तिघा जणांनी संताेष व त्यांच्या मित्राला थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील तीन लाख रुपये जबरीने हिसकावून घेत कोणाला सांगितले तर ठार करू, अशी धमकी दिली. तेथून पैसे घेऊन पळून गेले.
या घटनेनंतर संतोष व त्यांचा मित्र चोंडी बहिरोबा गावाकडे आले. नंतर कुरुंदा पोलीस ठाणे गाठत घटनेची हकीकत कथन केली. त्यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर नारायण जाधव व इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि सुनील गोपीनाथ, जमादार गजानन करीत आहेत.