सभापतींवरील अविश्वास फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:57 PM2018-07-21T23:57:00+5:302018-07-21T23:57:15+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास शनिवारी दहा विरुद्ध एका मताने फेटाळला. आजी-माजी आमदारांच्या गटाला अविश्वास ठराव पारित होण्यासाठी आवश्यक ११ संचालकाचा आकडा गाठता न आल्याने धक्का बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास शनिवारी दहा विरुद्ध एका मताने फेटाळला. आजी-माजी आमदारांच्या गटाला अविश्वास ठराव पारित होण्यासाठी आवश्यक ११ संचालकाचा आकडा गाठता न आल्याने धक्का बसला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकर गटाची सत्ता आहे. ९ महिन्यांपूर्वी खांदेपालटामध्ये बाजार समितीची सूत्रे अनपेक्षितपणे काँग्रेसचे डॉ. नीळकंठ गडदे यांच्याकडे गेले होते. असे असताना सत्ताधारी गटात निर्माण झालेल्या दुफळीत गडदे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या संचालकांनी भाजपच्या संचालकांना सोबत घेवून ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. एकूण ११ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सत्ताधारी गटाच्या संचालकांनी एकत्र येवून अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने हा प्रस्ताव पारित होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. यात सभापती डॉ. गडदे हे एकाकी पडले होते. शनिवारी या प्रस्ताव निर्णय घेण्यासाठी पिठासीन अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. या सभेला एकूण मतदान पात्र १६ संचालकांपैकी ११ उपस्थित होते. अविश्वास प्रस्तावावरील मतदानात ११ संचालकांनी भाग घेतला.
अविश्वास ठरावाच्या बाजूने संचालक संजय देशमुख, द्वारकादास सारडा, शंकर बोरुडे, गोपाळराव देशमुख, गिरधारी तोष्णीवाल, श्रीकांत कोटकर, अमोल हराळ, इंदुताई देशमुख, गोदावरी शिंदे, सुमित्रा नरवाडे आदी १० तर विरोधी बाजूने सभापती डॉ. गडदे यांचे यांचे स्वत:चेच एक मत पडले.
अविश्वास ठराव आणणाºया सत्ताधारी गटाचे संचालक संतोष इंगोले यांच्यासह विरोधी गटाचे विनायकराव देशमुख, आयाजी पाटील, दत्तराव टाले, छाया पोले आदी संचालक या बैठकीस गैरहजर राहिले. अविश्वासासाठी आवश्यक असणारी ११ मते मिळाली नसल्याने हा प्रस्ताव चोरमारे यांनी फेटाळला. सत्ताधारी गटाने आपल्याच गटाच्या सभापतीवर आणलेला अविश्वास प्रस्ताव त्यांच्या गटाचा एक संचालक फुटल्याने फेटाळला गेला.
बाजार समितीत विरोधकांनी या आयत्या संधीचा फायदा घेत सभापती गडदे यांना आपल्या गटाकडे ओढले. आजी-माजी आमदारांच्या गटाने आणलेला अविश्वास फेटाळला गेल्याने या राजकारणात त्यांना चपराक बसली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक निबंधक एम.ए. भोसले, सचिव दत्तात्रय वाघ, मंडळ अधिकारी अंकुश पोले यांनी काम पाहिले.
बाजार समितीच्या हितासाठी आम्ही अविश्वास प्रस्ताव आणला होता. विरोधकांनी आमचा एक संचालक फोडल्याने अआवश्यक असणारे संख्याबळ जोडता आले नाही. बाजार समितीच्या विकासाकरीता यापुढेही सातत्याने प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया संचालक कांतराव कोटकर यांनी दिली.
आमच्या पक्षाच्या संचालकांच्या अवाजवी अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नसल्याने त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. तो फेटाळला गेल्याने मला प्रामाणिकतेची पावती मिळाली. शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांनी सांगितले.
या अविश्वास प्रस्तावासाठी आयोजित विशेष बैठकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. मागच्या वेळी सभापती निवडीला झालेल्या गोंधळामुळे ही खबरदारी घेतल्याचे दिसून येत होते.