शेतकऱ्यांत नाराजगी, १० हजार कट्टे हळद आली अन् दर क्विंटलमागे ५०० ते ७०० ने घसरले

By रमेश वाबळे | Published: May 6, 2024 07:14 PM2024-05-06T19:14:00+5:302024-05-06T19:14:39+5:30

येथील मार्केट यार्डात पंधरवड्यापासून हळदीची विक्रमी आवक होत असल्याने काट्यासाठी दोन ते तीन दिवस लागत आहेत.

Discontent among the farmers, 10 thousand pieces of turmeric came and fell by 500 to 700 per quintal | शेतकऱ्यांत नाराजगी, १० हजार कट्टे हळद आली अन् दर क्विंटलमागे ५०० ते ७०० ने घसरले

शेतकऱ्यांत नाराजगी, १० हजार कट्टे हळद आली अन् दर क्विंटलमागे ५०० ते ७०० ने घसरले

हिंगोली : येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला आठवडाभरापासून भाववाढीची झळाळी मिळत होती. ६ मे रोजी मात्र क्विंटलमागे जवळपास पाचशे ते सातशे रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. या दिवशी १० हजार कट्टे हळद विक्रीसाठी आली होती.

येथील मार्केट यार्डात पंधरवड्यापासून हळदीची विक्रमी आवक होत असल्याने काट्यासाठी दोन ते तीन दिवस लागत आहेत. त्यामुळे बाजार समितीने सोमवार ते शुक्रवारदरम्यान हळदीचे बीट आणि मोजमाप करण्याचे नियोजन केले. तर शनिवार आणि रविवारी शिल्लक राहिलेल्या हळदीचे मोजमाप करण्यात येते. ४ आणि ५ मे रोजी मार्केट यार्ड बंद राहिल्यामुळे सोमवारी हळदीच्या १० हजार कट्ट्यांची आवक झाली. लवकर बीट आणि मोजमाप व्हावे, मुक्काम पडण्याची वेळ येऊ नये यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी वाहनांद्वारे हळद घेऊन रविवारीच मार्केट यार्ड जवळ केले होते. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत जवळपास एक ते दीड किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या वाहनांना रांगेत मार्केट यार्ड आवारात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर दुपारी बीट पुकारण्यात आले. यात गत आठवड्याच्या तुलनेत जवळपास पाचशे ते सातशे रुपयांनी दर घसरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ३ मे रोजी हळदीला १५ ते १७ हजार, तर ६ मे रोजी १४ हजार ३०० ते १६ हजार ६०० रुपये भाव मिळाला होता. तर ६ मे रोजी मात्र भावात घसरण झाली.

भाव घसरल्याने शेतकऱ्यांत नाराजी...
मार्केट यार्डात सोमवारी क्विंटलमागे जवळपास पाचशे ते सातशे रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजी पुढे आली. गत आठवड्यात हळदीला भाववाढीची चकाकी मिळाली होती. भाव या आठवड्यातही कायम राहील, अशी आशा होती. मात्र, भावात घसरण झाली.

Web Title: Discontent among the farmers, 10 thousand pieces of turmeric came and fell by 500 to 700 per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.