औंढा तीर्थक्षेत्र आराखड्यावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:48 AM2018-09-18T00:48:37+5:302018-09-18T00:49:06+5:30
औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दोन टप्प्यांत ६0 कोटींच्या विकास कामांचा हा आराखडा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दोन टप्प्यांत ६0 कोटींच्या विकास कामांचा हा आराखडा आहे.
मागील अनेक दिवसांपासून औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी दोनदा मंत्रालय स्तरापर्यंत जावूनही विविध त्रुटी काढल्याने आराखडा माघारी पाठविण्यात आला. यावेळी या आराखड्यावर बारकाईने काम केले जात आहे. या आराखड्यातील विकास कामांचे प्रस्ताव काटेकोर तपासणी करून तयार करण्यात आले आहेत. यावर लवकरच मुख्य सचिवांसमोर बैठक होणार आहे. या आराखड्यात पहिल्या टप्प्यात २५ कोटी तर दुसऱ्या टप्प्यात ३५ कोटींच्या विकास कामांचा समावेश आहे. यात विविध सुधारणांच्या सूचना देत या आराखड्याच्या प्रारुपाचे अंतिमीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भंडारी यांनी दिल्या. या आराखड्यात प्रसादालय, भक्तनिवास, मंदिर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, मंदिरानजीक व्यापारी संकुल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महादेव वन, हरिहर तलाव सुशोभिकरण, घाटाचे बांधकाम आदी कामे करण्यात आली आहेत.
या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, पोलीस उपाधीक्षक सुजाता पाटील, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपअभियंता लोखंडे, आरेखक देशपांडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.