ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद भावकीत पेटला; दोन गटात भल्या पहाटे तुंबळ मारामारी, १३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:53 PM2022-12-28T14:53:32+5:302022-12-28T14:55:12+5:30
कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे सूर्योदयापूर्वीच गावात मारहाणीची भीषण घटना घडली.
आखाडा बाळापूर (हिंगोली): ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद आता भावकीत पेटला आहे. ग्रामपंचायत निवडणूक आणि शिवसेनेतील गटाची उभारणी यावरून भावकीतल्या दोन गटात सुरू झालेली धूसपफूस आता हाणामारीवर आली. भल्या पहाटे कांडलीत भावकीतल्या दोन गटात तुंबळ मारामारी झाली. लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडने मारहाण केल्याने १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविले आहे.
कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे सूर्योदयापूर्वीच गावात मारहाणीची भीषण घटना घडली. पहाटे काही कळायच्या आत लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडसह दोन गट भिडले. मारहाणीची घटना घडल्याचे कळतात बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. हाणामारीच्या घटनेने गोंधळ उडाल्यानेच गाव झोपेतून जागे झाले. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले.
चुलत्या पुतण्यांचे हे वाद असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामपंचायत निवडणुकीवरून पेटलेला वाद आता हाणामारीवर आला. पहाटे झालेल्या हाणामारीत १३ जन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कांडली गावात काही दिवसापूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यात दोन्ही गटाचे उमेदवार उभे होते. यातील एक गट पराभूत झाला आणि वादाला तोंड फुटले. दरम्यान, येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शाखा स्थापन करून मोठ्या जल्लोषात नव्या गटाची उभारणी सुरू झाली. यावरून भावकीतील दोन गट आमने-सामने आले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली होती. हाणामारीही झाली. तेव्हांही बाळापूर पोलीस घटनास्थळी गेले. दोन्ही गटाला तक्रार देण्याबाबत सांगितले. परंतु दोन्ही गटांनी पोलिसांना हा आमच्यातील आपसातील वाद असल्याचे सांगितले. त्यानंतर बाळापूर पोलिसांनी दोन दिवसापूर्वीच्या वादा बाबत दोन्ही गटांच्या जबाबाची नोंद स्टेशन डायरीला केली.
जखमींची नावे...
शेख ताहेर शेख नूर , शेख अख्तर शेख नूर , शेख सदाम शेख अख्तर , शेख जखीर शेख अख्तर , शेख मुस्तकीन शेख तबरीत , शेख मिनाज शेख अनवर, शेख रिजवान शेख मिनाज, शेख मदत्युयबी शेख बशीर, शेख नौशाद शेख मिनाज, शेख दिलशाद शेख मुस्तकीन, शेख जमीर शेख अख्तर, शेख समीर शेख तब्दील.