हिंगोली जिल्ह्यातील २० गुरुजी ठरले अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:07 AM2018-07-11T01:07:02+5:302018-07-11T01:08:15+5:30
शासनाने यंदा आॅनलाईन बदल्या केल्या. त्यात काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रे जोडून बदल्यांमध्ये अपेक्षित ठिकाण मिळविल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावरून केलेल्या पडताळणीत जवळपास २0 शिक्षक थेट अपात्र ठरले. तर आणखी २१ जणांचे प्रमाणपत्र फेरतपासणीस गेले. २ प्रकरणांत निर्णय राखीव ठेवला असून यांचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाने यंदा आॅनलाईन बदल्या केल्या. त्यात काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रे जोडून बदल्यांमध्ये अपेक्षित ठिकाण मिळविल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावरून केलेल्या पडताळणीत जवळपास २0 शिक्षक थेट अपात्र ठरले. तर आणखी २१ जणांचे प्रमाणपत्र फेरतपासणीस गेले. २ प्रकरणांत निर्णय राखीव ठेवला असून यांचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात पाच टप्प्यांमध्ये जवळपास दीड हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यातील संवर्ग १ व २ मध्ये विविध प्रमाणपत्रांचा आधार घेऊन शिरकाव केल्याच्या अनेक तक्रारी शिक्षकांतूनच होत्या. त्याची तपासणी शिक्षण विभागाकडून मंगळवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली. यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, बांधकामचे राजाराम चंदाले, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींसह सर्व तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वयात गोंधळ करून बदली मिळविल्याची शंका असलेल्यांच्या थेट सेवापुस्तिकाच तपासल्या. त्यामुळे ५३ वर्षांवरील शिक्षकांना जि.प.त बोलावलेच नव्हते. त्यामुळे जवळपास सव्वाशे शिक्षकांनाच या समितीसमोर पाचारण केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली. तर पती-पत्नी एकत्रिकरणात या शिक्षकांनी त्या दोघांच्या शाळांतील दिलेले अंतर बांधकाम विभागाकडून तपासून घेण्यात आले. ज्यांचे अंतर ३0 किमीपेक्षा जास्त असेल अशांना पात्र ठरविले. मात्र ज्यांचे अंतर त्यापेक्षा कमी होते. अशांवर अपात्रतेचा शिक्का मारला. त्यामुळे अनेक शिक्षक अंतर कसे बरोबर आहे, हे आॅनलाईनच्या कागदांवर दाखवूनच सांगत होते. मात्र त्यात शासनाने जवळच्या मार्गाचे अंतर पकडण्यास सांगितल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांना निरुत्तर व्हावे लागले.
काहींना तर ३0 किमी अंतर असूनही शासन नियमात त्यापेक्षा जास्त म्हटल्याचे सांगून अपात्रच्या यादीत टाकल्याने अतिशय काटेकोर तपासणी झाल्याचे दिसून येत होते.
---
७२ पात्र : २ प्रकरणांत निकाल राखीव
ज्यांना संदिग्ध म्हणून बोलावले होते, त्यापैकी ७२ जणांना जागीच पात्र ठरवले. तर २0 जण प्रमाणपत्रे व पती-पत्नी एकत्रिकरणातील अंतरात बसत नसल्याने थेट अपात्र ठरविले आहेत. याशिवाय १५ जणांनी महिन्यात अपंगत्वाची आॅनलाईन प्रमाणत्रे सादर करण्यास सांगितले आहे. तर अन्य ५ जणांच्या प्रमाणपत्रांवरच शंका असल्याने त्यांना पुन्हा आरोग्य बोर्डाकडे पाठविले. याशिवाय दोन प्रकरणे तर अशी आहेत, त्यावर समितीलाच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे ही प्रकरणे राखीव ठेवून यात आणखी बारकाईने तपासून निर्णय घेतला जाणार आहे.
---
पुन्हा धकधक
ज्या शिक्षकांना आता अपात्र ठरविले, अशांची पुन्हा धाकधूक वाढली आहे. या शिक्षकांचे आता नेमके काय होणार आहे, हा गंभीर प्रश्न आहे. हे शिक्षक अपात्र ठरताच पुन्हा चिंतेत सापडले आहेत.