विदारक ! हिंगोलीत दिड महिन्याच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:56 PM2018-03-01T15:56:31+5:302018-03-01T15:58:31+5:30
शहरातील आजम कॉलनीभागात दिड महिन्याच्या बालकाचे पिसळलेल्या कुत्र्याने लचके तोडल्याची घटना आज सकाळी ११. ३० च्या सुमारास घडली.
हिंगोली : शहरातील आजम कॉलनीभागात दिड महिन्याच्या बालकाचे पिसळलेल्या कुत्र्याने लचके तोडल्याची घटना आज सकाळी ११. ३० च्या सुमारास घडली. किसन पारस मोरय्या असे या दिड महिन्याच्या बालकाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, बालकाला त्याच्या आईने दुध पाजून जमिनीवर अंथरुनावर टाकुन त्या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तोच पिसाळलेल्या कुत्र्याने घरात प्रवेश करुन थेट बालकावरच झेप घेतली व लचके तोडण्यास सुरुवात केली. बालकाचा जोराने रडण्याचा आवाज आल्याने आईसह परिसरातील नागरिकांनी बालकाडे धाव घेतली. त्यामुळे कुत्र्याने तेथून पळ काढला.
यानंतर पालकांनी व नागरिकांनी बालकाला तत्काळ जिल्हासामान्य रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न केले. कुत्र्याने बालकाच्या डाव्या बाजूचा डोळा व डोक्याला जबर चावा घेतला आहे. यामुळे बालक पूर्णतः रक्तबंबाळ झाले होते. बालकावर डॉ. अजय शिराडकर, डॉ. मोरे यांनी उपचार केले. जखम गंभीर असल्याने बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आल्याची माहिती डॉ. इनायत्तुला खान यांनी दिली.
कामासाठी आलेले आहे मोरय्या कुटूंब
मोरय्या कुटूंब हे मुळचे उत्तरप्रदेशातील रहिवाशी आहे. मात्र ते हिंगोलीतच ८ ते ९ वर्षापासून कामानिमित्त दाखल झालेले आहे. दोघे पती- पत्नी शहरातील एका बेकरीवर कामास आहेत. सदरील घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी निवेदनाद्वारे पालिकेकडे करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली
शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्र्यांचा अद्याप पालिकेच्यावतीने बंदोबस्त केलेला नाही. विशेष म्हणजे रात्री - अपरात्री मोकाट कुत्रे वाहनांचा पाठलाग करत असून, पादचा-यांवरही धावून जात आहेत. कुत्रे एवढे हिसंक बनलेले आहेत ते त्यांना हाकण्याचा प्रयत्न केला तर जास्तच अंगावर धावून येत आहेत.
कुत्रा पकडण्याचा सुचना दिल्या
सुप्रिमकोर्टाच्या आदेशानुसार प्राण्याला हात लावणे तर सोडाच त्याला पकडणेही कठीण झाले आहे. परंतु पिसाळलेला कुत्र्याने चावा घेतला असेल तर त्याला ताब्यात घेऊन मारता येईल. त्यासाठी घटना घडलेल्या परिसरात पालिकेच्या साफाई कामगारांना पाठवून सदरील कुत्रा ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. शिवाय, शहरातील मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त लावण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु असल्याचे न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.