मीटिंगला बोलावून दारू विक्रेते, मटका जुगाऱ्यांना ‘प्रसादा’चे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:58+5:302021-09-14T04:34:58+5:30
हिंगोली : आगामी सण, उत्सवाच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठकीसाठी बोलावून घेत अवैध दारू विक्रेते, मटका जुगाऱ्यांना सोमवारी पोलीस ...
हिंगोली : आगामी सण, उत्सवाच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठकीसाठी बोलावून घेत अवैध दारू विक्रेते, मटका जुगाऱ्यांना सोमवारी पोलीस अधीक्षकांनी चांगलाच प्रसाद दिला. पुन्हा मटका जुगार खेळविल्यास अथवा दारूविक्री केल्याचे आढळल्यास गय केली जाणार नसल्याची तंबी दिली. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या धुलाईची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईची मोहीम राबविली जात आहे. अवैध दारू विक्रेते, मटका खेळणारे व खेळविणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जात आहेत. मात्र तरीही अनेक जण अवैध दारू विक्री करण्याचे तसेच जुगार खेळविण्याचे थांबवित नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वारंवार गुन्हे दाखल करूनही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी नवीन फंडा वापरण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर रोजी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आगामी सण, उत्सवासंदर्भात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेते, मटका खेळविणारे तसेच खेळणाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यानुसार सोमवारी दुपारी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या ४० ते ५० अवैध धंदे चालक दाखल झाले. यावेळी पुन्हा अवैध दारू विक्री, मटका जुगार न खेळविण्याची तंबी पोलीस अधीक्षकांनी दिली. तसेच यावेळी प्रत्येकाला पोलिसी खाक्या दाखवत प्रसादही दिला. पोलीस अधीक्षकांच्या प्रसादाने अवैध धंदा नको रे बाबा असा सूर अवैध धंदे चालकांतून उमटत होता. यापुढे पुन्हा मटका जगार खेळविताना अथवा खेळताना आढळून आल्यास गय केली जाणार नसल्याची तंबी पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली. या प्रसादाची चांगलीच चर्चा रंगत आहे.