जिल्ह्यात ६0५ बालके कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:22 AM2017-08-02T00:22:44+5:302017-08-02T00:22:44+5:30
जिल्ह्यात ग्रामीण भागात कुपोषित १६४ तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४४१ एवढी आहे. आता शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे सर्वच कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल केले जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात कुपोषित १६४ तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४४१ एवढी आहे. आता शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे सर्वच कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल केले जाणार आहे.
यापूर्वी कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य विभागाकडून महिला व बालकल्याण विभागाला निधी दिल्यानंतर एका महिनाभरात या मुलाला पोषण आहार देवून त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असे. मात्र आता त्यात बदल केला आहे. शासनाने थेट या विभागालाच निधी देवू केला. तो आयुक्त स्तरावरून खर्ची पडणार आहे. शहरी असो वा ग्रामीण भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील सर्वच बालकांच्या दंड घेर, उंची व वजनाची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी सेविकांमार्फत वैद्यकीय अधिकारी तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर पर्यवेक्षिकांकडून त्यांची पुन्हा पाहणी केली जाणार आहे. त्यातून वयानुसार कुपोषणात मोडणाºया बालकांना बारा आठवड्यांसाठी बाल विकास केंद्रात ठेवून त्यांना इडीएनएफ अर्थात एनेर्जी डेन्स न्यूट्रिशियस फूड दिले जाणार आहे. ते १00 ग्रामचे पाकिट असून ते बालकांनी खावे यासाठी त्यात गोडवाही असणार आहे.
जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांची प्रकल्पनिहाय संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता सरसकट बालकांची तपासणी होणार आहे. तर त्यात दंडाचा घेर, वजन, उंची व वयाचे निकष काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. या सर्व प्रकारामुळे तीव्र कुपोषित बालकांचीच खरी संख्या साडेचारशेच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. शिवाय यात अंगणवाडीच्या बाहेरील मुलांचीही तपासणी करायची असल्याने त्या मुलांचीही माहिती आता नव्याने उपलब्ध होणार आहे. सध्या असलेली आकडेवारी ही अंगणवाडीत येणाºया बालकांचीच आहे. त्यामुळेही संख्येत वाढ होणार आहे. तर काही ठिकाणी हे आकडे कमी दाखविले जाण्याची शक्यता असून त्यांनाही आता लपवा-छपवी न करता यात चांगले काम करण्याची संधी आहे.