जिल्हा वार्षिक योजना समिती छाननी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:55 PM2019-01-05T23:55:43+5:302019-01-05T23:58:01+5:30
जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० च्या प्रारुप आराखडा छाननी करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या छाननी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ५ जानेवारी रोजी घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० च्या प्रारुप आराखडा छाननी करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या छाननी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ५ जानेवारी रोजी घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्यासह सर्व विभागातील विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
सर्व प्रशासकीय यंत्रणानी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्रस्ताव सादर करतांना सर्वसामान्य जनतेचे हित व गरजा लक्षात घेऊनच प्रस्ताव सादर करावेत. तसेच उपलब्ध झालेल्या निधीचा विनियोग चांगल्या कामासाठी करुन सदर निधी वेळेत खर्च करावा. तसेच विहित वेळेतच प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना आ. तान्हाजी मुटकुळे यांनी दिल्या. बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना व अनुसूचित जाती उपयोजना, अनुसूचित जमाती उपयोजना प्रारुप आराखडा २०१९-२० ची छाननी संदर्भात तसेच अद्ययावत २०१८-१९ मध्ये खर्च झालेला निधी व २०१९-२० मध्ये प्रस्तावित कामे यासंदर्भात आ. तान्हाजी मुटकुळे यांनी आढावा घेतला.
यावेळी जलसंधारण, कृषी विभाग, नगर विकास, आरोग्य विभाग, वन विभाग, शालेय, पाणीपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग इ. विभागांच्या योजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. छाननी केलेला आरखडा आगामी जिल्हा नियोजन समितीची मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.