आंदोलनांनी दणाणली जिल्हा कचेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:12 AM2018-12-18T00:12:39+5:302018-12-18T00:13:13+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर १७ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांनी अर्धनग्न अवस्थेत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर १७ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांनी अर्धनग्न अवस्थेत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ग्रामरोजगार सेवक संघटनेने एकदिवशीय धरणे आंदोलन केले. औंढा येथे नवीन दारू दुकाने स्थलांतरित करण्यास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. विविध आंदोलनांनी सोमवारी शहर दणाणून गेले होते.
बेरोजगार दिव्यांगाच्या विविध मागण्यांची पुर्तता करावी, अन्यथा भिकमांगो आंदोलन केले जाईल. या संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना जिल्हा कर्णबधीर असोसिएशन संघटनेच्या वतीने दिले होते. शिवाय १६ डिसेंबर पर्यंत दिव्यांगाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला होता. परंतु याबाबत दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील दिव्यांगांनी जिल्हा कचेरीसमोर अर्धनग्न होऊन भीक-मांगो आंदोलन करत शासनविरोधी घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाभरातील बेरोजगार दिव्यांग सोमवारी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले होते.
ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १७ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामरोजगार सेवकास शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्टÑ राज्यातही ग्रामरोजगार सेवकास अठरा हजार रूपये वेतन द्यावे. तसेच हे वेतन त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करावे. राष्टÑीय रोजगार हमी योजनेची स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी. यासह विविध मागण्यां आहेत. परंतु मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे दुर्लक्ष असून वारंवार पाठपुरावा करूनही या विषयाचे गांभीर्य घेतले जात नाही. त्यामुळे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर मागण्या मान्य न केल्यास २४ डिसेंबर रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांनी दिले निवेदन
औंढा नागनाथ नगर पंचायत हद्दीतमध्ये नवीन देशी दारूचे दुकान, बीअर बार व वाईन शॉपला शासनाने मंजूरी देऊ नये, या मागणीसाठी ग्रामस्थ हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. यापूर्वीही पोलीस प्रशासन व संबधित विभागाकडे निवेदने नागरिकांनी सादर केली आहेत. औंढा नागनाथ येथे शिवशंकराचे ज्योतिर्लिग असून या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. धार्मिक जागतिक स्थळ असल्याने नवीन दारू दुकाने स्थलांतरित करण्यास परवाना देण्यात येऊ नये, तसेच स्थानिक प्रशासनासही नवीन परमिट रूम व बीअर शॉपीला मंजुरी देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने पुरूष, महिलांची उपस्थिती होती.