मेगाभरतीसाठी जि.प.त १४७ रिक्त जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:33 AM2019-01-19T00:33:27+5:302019-01-19T00:33:44+5:30
राज्यात मेगाभरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या-त्या संस्थांतील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. मात्र आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया होईल की नाही, याचीच शंका दिसून येत आहे. शिवाय हिंगोलीत जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालय या दोन मोठ्या संस्थांमध्ये केवळ १७५ जागा भरल्या जाण्याची शक्यता असल्याने यापूर्वीच्या आ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यात मेगाभरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या-त्या संस्थांतील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. मात्र आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया होईल की नाही, याचीच शंका दिसून येत आहे. शिवाय हिंगोलीत जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालय या दोन मोठ्या संस्थांमध्ये केवळ १७५ जागा भरल्या जाण्याची शक्यता असल्याने यापूर्वीच्या आकड्यांचे काही खरे दिसत नाही.
शासनाने यापूर्वी जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक आखून दिले होते. कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल करू नये, असेही सांगितले होते. मात्र जागा भरण्यावर निर्बंध घातल्याने एक ते दोन जागांची भरती व्हायची. त्यासाठी येणाऱ्या हजारो अर्जांमुळे प्रशासनाची दमछाक व्हायची. आता राज्यात एकत्रित भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगितले जाते. यासाठी जिल्हा परिषदेने तर रिक्त पदांचा अहवालही दिला आहे. एकूण १८२ जागा रिक्त असल्या तरीही अनुकंपासाठी राखीव ठेवलेल्या ३१ जागा यातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण १४७ जागा रिक्त राहात आहेत. यात आरोग्य सेवक महिला-९0, आरोग्य सेवक पुरूश-२७, ग्रामसेवक ६, पशुधन पर्यवेक्षक २, अंगणवाडी पर्यवेक्षिका-३, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ५, औषध निर्माण अधिकारी-४, कनिष्ठ अभियंता १0 अशा रिक्त जागा आहेत. याला पूर्णपणे मंजुरी मिळाली तर एवढ्या जागा निघण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात तर तलाठ्यांच्याच जास्त जागा असून एकूण २५ जागा रिक्त असल्याने ते भरल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेगा भरतीत या दोन प्रमुख संस्थांमध्ये तांत्रिक पदे वगळता इतर पदांची संख्या नसल्यातच जमा आहे. त्यामुळे ही भरती केवळ तांत्रिक पदांसाठीच होणार की काय? असे चित्र दिसत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया होणे शक्य दिसत नसून तयारी करणाºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.
हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर सगळीकडेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. मेगा भरतीच्या आशेने अनेकजण क्लासेसलाही जात आहेत. मात्र होणाºया भरतीत तांत्रिक पदांचीच संख्या जास्त असल्याचे हिंगोली जिल्ह्यात तरी दिसत आहे. त्यामुळे उर्वरित पदांसाठी मोठी चुरस राहणार आहे. त्यातच शासनाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठीही अटींमध्ये शिथिलता प्रदान केली आहे. त्यात केवळ टीईटी उत्तीर्णतेचा प्रश्न राहणार आहे. मात्र सर्वच पदे राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेवून केंद्रिय पद्धतीने भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.