समाजासाठी धोकादायक बनलेल्या डिजे चालकाची एमपीडीए खाली कारागृहात रवानगी
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: August 8, 2023 01:39 PM2023-08-08T13:39:21+5:302023-08-08T13:40:36+5:30
सतत गुन्हे करीत असल्याने तो समाजासाठी धोकादायक बनला होता.
हिंगोली : सतत गुन्हे करीत असल्याने समाजासाठी धोकादायक ठरलेल्या एका डिजे चालकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याची परभणी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.
देवानंद उर्फ सोनू शिवाजी जाधव (रा.सिद्धार्थनगर, जवळा पळशी रोड हिंगोली) असे एमपीडीएअंतर्गंत कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचेवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. सतत गुन्हे करीत असल्याने तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याचेवर एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करावी, असा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत देशपांडे यांच्यामार्फत हिंगोली शहरचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला होता.
या प्रस्तावाची तपासणी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी पापळकर यांनी प्रस्तावाची पडताळणी करून देवानंद जाधव याचेवर एम.पी.डी.ए.अंतर्गंत कार्यवाही करीत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमीत केले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याची परभणी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठ महिन्यात २२ जणांची कारागृहात रवानगी
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी अवैध धंदे चालक, सराईत गुन्हेगार, सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध कार्यवाहीची कडक भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रीया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गंत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर ८ ते ९ महिन्यात तब्बल २२ जणांवर एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करण्यात आली.