दररोज घरच्या घरी करा ६ मिनिटे ‘वॉक टेस्ट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:29 AM2021-04-21T04:29:53+5:302021-04-21T04:29:53+5:30
हिंगोली : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यात गर्दी करीत आहे. दवाखान्यातील गर्दी लक्षात ...
हिंगोली : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यात गर्दी करीत आहे. दवाखान्यातील गर्दी लक्षात घेता आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य व्यवस्थित आहे का, हे घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (वॉक टेस्ट) करून पाहता, तपासता येणार आहे. आरोग्य विभागानेही यावर भर दिला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. आता घरच्या घरी चाचणी करून आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य तपासता येणार आहे. सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीने रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल. यामुळे गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल. सहा मिनिटे चालण्याची चाचणी ही एक सोपी व घरगुती पद्धत आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली, तरी ऑक्सिजन पातळी नेमकी कशी आहे, हे दररोज तपासून घेणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता आवश्यक ठरत आहे.
असे लागणार साहित्य
घड्याळ, स्टॉप वॉच (मोबाइल फोन), पल्स ऑक्सिमीटर
कोणी करायची ही टेस्ट
ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.
अशी करा चाचणी
चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे. अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये, तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालूनही रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर प्रकृती उत्तम, असे समजावे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करण्याचे कारण नाही. यामध्ये काही बदल होत नाही, हे पाहण्यासाठी दिवसांतून दोन वेळा ही चाचणी करावी.
... तर घ्या काळजी
जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा अधिकने कमी होत असेल, किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल, तर ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्रतिक्रीया...
दररोज सहा मिनिटे वॉक टेस्ट करून ऑक्सिजन पातळी तपासणी करता येते. ही एक सोपी व घरगुती पद्धत आहे. ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो, त्यांनी ही चाचणी करू नये. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात; मात्र एका व्यक्तीला सोबत बसवणे चांगले. जेणेकरून खूप दम लागला तर ती मदत करू शकेल.
-डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.