वसमतमध्ये दुर्गंधीने बसवत नाही... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:56 AM2018-08-06T00:56:12+5:302018-08-06T00:56:40+5:30
वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई पसरण्याच्या भीतीने नागरिक हैराण असल्यानचे चित्र येथे पहायला मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई पसरण्याच्या भीतीने नागरिक हैराण असल्यानचे चित्र येथे पहायला मिळते.
वसमत तालुका व उपजिल्हा ठिकाण मोठी बाजारपेठ, उत्पन्नाच्या, शिक्षणाच्या व आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी शहरात मात्र स्वच्छतेच्या नावाने ‘बोलाचीच कढी आन् बोलाचाच भात’! या म्हणी प्रमाने केवळ फलक, कचरा पेट्या, घंटा गाड्याच पहायला मिळतात. शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोरील पेट्रोल पंपाच्या बाजूस, बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या पूर्वेकडील गेटवर, वसमतशहरातील सार्वजनिक वाचनालयासमोर, भाजीमंडी परिसर, जवाहर बालक विद्यालयाच्या बाजूस, श्री योगानंद महाविद्यालय रस्त्याच्या बाजूसह महाविद्यालयाजवळच कच-याचे ढिगारे साचल्याने दुर्गंधीसह परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. भाजीपाला विक्रेते जून्या तहसीलसमोर कच-यातच बसतात;परंतु नागरिकांना नाईजाने माशा बसलेला भाजीपाला घ्यावा लागतो. उपजिल्हा रुग्णालय परिसरात,सार्वजनिक शौचालय गंगाप्रसाद अग्रवाल मार्केट परिसरासह स्त्री रूग्णालयाकडे जाण्याच्या मार्गातील परभणी रोडवरील दाद-याला लागूनच टाकाऊ मांस, चरबी, चारवट, पंख अशा स्वरूपातील अतिशय दुर्गंधी निर्माण करणारा कचरा वाटेत टाकला जातो. त्यामुळे येथे डुकरासह कुत्र्यांचा ऊत आल्यामुळे रूग्णासह, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचा-यांना रूग्णालयात जाण्यासाठी त्रास होत आहे. अशा कच-यासह शहरातही गल्लोगल्ली देखील कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई व दुर्गंधी पसरण्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त आहेत. स्वच्छ भारत मिशन च्या नावाखाली शासनाने लाखो रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छता मात्र कायम आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होऊन जागोजागी फलक व कचरा पेट्याच लावण्यात आल्या. लोकजागृती व प्रत्यक्ष कार्यवाही कागदावरच आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
---
प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे...
योगानंद स्वामी महाविद्यालयात जातांना देखील विद्यार्थी व महाविद्यालयीन कर्मचार्यांना नगरपालिकेच्या घंटागाडीकडून टाकल्या जाणा-या कच-यामुळे प्रचंड त्रास होतो. या कचरा ढिगा-याच्या बाजूलाच महाविद्यालय असल्याने कच-याच्या दुर्गंधीचाही त्रास होत असल्याने प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन शहरातील कचरा उचलण्यासह तो वस्ती, माणसांच्या वर्दळीपासून दूर टाकावा, अशी मागणी सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.