पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:35 AM2021-09-17T04:35:35+5:302021-09-17T04:35:35+5:30

५२४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले कम्फर्म : १३ सप्टेंबरपासून पहिली प्रवेश फेरी सुरू हिंगोली : पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी ...

Do you get a job after polytechnic, brother? | पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ ?

पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ ?

Next

५२४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले कम्फर्म : १३ सप्टेंबरपासून पहिली प्रवेश फेरी सुरू

हिंगोली : पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी नाही मिळाली तरी रोजगाराची संधी तरी उपलब्ध होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे असून, यावर्षी पहिल्यांदाच तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२४ जणांनी अर्ज कम्फर्म केले आहेत.

शासकीय नोकरीच्या संधी कमी होत चालल्या आहेत, तसेच शासकीय नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे शासकीय नोकरीच्याच केवळ मागे न लागता रोजगारही उपलब्ध झाला पाहिजे व नोकरीची संधीही मिळाली पाहिजे, या उद्देशाने अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निककडे वळले आहेत. यापूर्वी पॉलिटेक्निक केलेले विद्यार्थी विविध कंपन्या व क्षेत्रांत कार्य करीत आहेत. त्यामुळे याहीवर्षी विद्यार्थी पॉलिटेक्निककडे वळले आहेत. दरम्यान, पॉलिटेक्निकसाठी ७ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची मुदत संपली असून, १३ सप्टेंबरपासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू झाली आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत विकल्प अर्ज भरून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर १८ ला जागावाटप होणार असून, १९ ते २३ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर, २४ सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे, तर १३ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रोजगाराची व नोकरीची संधी असल्याने विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेशासाठी झगडावे लागणार असल्याचे चित्र आहे.

सिव्हिल, संगणकाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ओढा सिव्हिल अभ्यासक्रमाकडे आहे. मात्र, जिल्ह्यातील पॉलिटेक्निकमध्ये हा अभ्यासक्रम नसल्याने इतर जिल्ह्यांत जावे लागत आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार प्रवेश घेत असले तरी जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा ओंढा कॉम्प्युटरकडे असल्याचे सांगितले जात आहे.

म्हणून पॉलिटेक्निकला पसंती

पॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय, तसेच निमशासकीय क्षेत्रात रोजगारांच्या संधी आहेत. दोन्हीतही संधी हुकल्या तर स्वत:चा व्यवसाय टाकू शकतो. यातून नवनवीन शिकता येते. आपल्या क्षमतांना वाव मिळतो.

-राजकुमार आम्ले, गिरामवाडी

पॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय नोकरीच्या संधी आहेत, तसेच कंपनीमध्येही रोजगार मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे आहे. मात्र, विद्यार्थ्यांना हवे असलेले अभ्यासक्रम हिंगोलीमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळेच नांदेड येथे जाऊन सिव्हिलला प्रवेश घ्यावा लागत आहे.

-मो. कैफ शेख फारुख बागवान, हिंगोली

पॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय व निमशासकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी बेरोजगार राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निकडे वाढला आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत.

-डॉ. अशोक उपाध्याय, प्राचार्य, शासकीय पॉलिटेक्निक, हिंगोली

सिव्हिल अभ्यासक्रमाची आवश्यकता

हिंगोली जिल्ह्यात एक खाजगी, तर एक शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आहे. शासकीय पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक व मेकॅनिकल, असे तीन अभ्यासक्रम आहेत. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा कल सिव्हिल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत, असा सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

Web Title: Do you get a job after polytechnic, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.