खेडेगावात डॉक्टर देता का डाॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:44+5:302021-06-24T04:20:44+5:30
हिंगोली : शासनाने कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये म्हणून कंत्राटी तत्त्वावर ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची नियुक्ती केली होती. ...
हिंगोली : शासनाने कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये म्हणून कंत्राटी तत्त्वावर ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची नियुक्ती केली होती. परंतु, खेडेगावात काम करण्याची इच्छा होत नसल्याने अनेकांनी हळूहळू नियोजित ठिकाणी जाण्याचे टाळल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. ज्यांचा नऊ महिन्यांचा करार संपला आहे, अशा ठिकाणी शासनाने आता एक वर्षाची ऑर्डर देऊन २७ जणांची नियुक्ती केली आहे.
२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले होते. कोरोनाकाळात कोणत्याही रुग्णांची गैरसोय होऊ नये, रुग्णांना सेवा वेळेच्यावेळी मिळावी म्हणून शासनाने मार्च महिन्यात जवळपास ३० कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती केली होती. कोरोनाकाळात ग्रामीण भागात १८ जणांची नियुक्ती केली होती. त्यापैकी त्यावेळी सर्व १८ जण हजर झाले. तर, शहरी भागात १२ जणांची नियुक्ती केली. त्यावेळी १२ जण हजर झाले होते. शहरी भागातील ९ जणांनी नोकरी सोडल्यामुळे आता ३ कंत्राटी डॉक्टर कार्यरत आहेत. त्यावेळी या सर्वांना ९ महिन्यांची ऑर्डर देण्यात आली होती. आजमितीस जिल्ह्यात बंधपत्रित २१, अस्थायी ५ आणि नियमित डॉक्टर हे ३५ आहेत. २७ डॉक्टरांना एक वर्षाची ऑर्डर देण्यात आलेली आहे. परंतु, आम्हाला कायमस्वरूपी सेवेत कायम करावे, अशी त्यांची मागणी आहे. खेडेगावात जाण्यास अनेक डॉक्टर हे टाळत आहेत. त्यामुळे खेडेगावात डॉक्टर देता का डॉक्टर? म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
प्रतिक्रिया
एक जागा रिक्त
जिल्ह्यातील कळमनुरी येथील तालुका आरोग्य रुग्णालयात आजमितीस एक जागा रिक्त आहे. सध्या तरी शासनाने या जागेबाबत काही सूचना केली नाही. आरोग्य विभागाने या जागेबाबत शासनाकडे पाठपुरावा केला आहे. शासनाची सूचना आल्यास कळमनुरीची जागा भरण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.
कारणे काय...
ग्रामीण भागात नोकरी करायची म्हटले की, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ना राहण्याची सोय, ना जेवणाची सोय. सर्वच बाबतीत आबाळ होते, असे कंत्राटी डॉक्टरांचे म्हणणे आहे. शासन मानधन स्वरूपात पगार देत आहे. परंतु, दैनंदिन सोयीसुविधा या ग्रामीण भागात मिळत नाहीत. शहरापासून एखादे गाव जवळ असले की, आम्ही रात्रीला शहरात असलेल्या घरी येेतो आणि नंतर नोकरीवर जातो.
व्यवस्थापन आहे पण अडचण कोण जाणणार?
शासनाने कोरोनाकाळात ७५ हजार रुपयांच्या मानधनावर नोकरी दिली. या काळात आम्ही रुग्णांची चांगली सेवा केली. परंतु, नऊ महिन्यांची ऑर्डर दिल्यामुळे आम्ही नाराज आहोत. अडचणीच्या काळात आम्ही साथ दिली आहे. आता शासनाने आम्हाला कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, असे वाटते. परंतु, शासनाने आमचा काहीही विचार केला नाही, असे एका डॉक्टरने सांगितले.
कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. शासनाने आमचे काम पाहून आम्हाला कायमस्वरूपी ऑर्डर द्यायला पाहिजे होती. परंतु, काहींना कमी करून, काहींना बंधपत्रित (एक वर्षाची) ऑर्डर देऊन सेवेत घेतले आहे. ज्यांना सेवेत घेतले आहे, त्याबद्दल आम्हाला काही हेवा वाटत नाही. परंतु, काम पडले की, बोलवायचे अन् नंतर हाकलून द्यायचे, हे मात्र शासनाने करायला नको होते.
कोरोनाच्या काळात जवळपास ३० कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती केली होती. शासन ज्याप्रमाणे सूचना देईल, त्याप्रमाणे आरोग्य विभागातील पदे ही भरली जातील. आजमितीस शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात २७ ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची एक वर्षासाठी (बंधपत्रित) नियुक्ती केली.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली
कोरोनाकाळात एकूण नियुक्त्या ३०
शहरी भागातील नियुक्त्या १२
हजर झाले किती १२
ग्रामीण भागातील नियुक्त्या- १८
हजर झाले किती १८