तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी डॉक्टर, औषधीसाठी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:31 AM2021-05-20T04:31:35+5:302021-05-20T04:31:35+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेल्या योग्य नियोजनामुळे दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे आवश्यक संख्येत बेड व मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जिल्ह्याला ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेल्या योग्य नियोजनामुळे दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे आवश्यक संख्येत बेड व मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जिल्ह्याला या संकटाचा सामना करता आला. तरीही अचानक मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येने नाकीनऊ आले होते. नव्याने व गतिमान पद्धतीने काही ठिकाणचे कोविड सेंटर उभारण्याची वेळ आली होती. आता दुसरी लाट कमी होत चालली आहे. सततच्या संचारबंदीमुळे व नागरिकांनी कोराेनाचे नियम पाळण्यास प्रारंभ केल्याने हे परिणाम दिसू लागले आहेत. मात्र तरीही धोका अजून टळला नाही. कोरोनाचा स्ट्रेन दिवसेंदिवस घातक बनत चालला आहे. नवी गुंतागुंत निर्माण करणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्याची तयारी असावी, यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नियोजनासाठी आढावा बैठक घेतली.
हिंगोली जिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र बाल कोविड सेंटर उभारले आहे. मात्र इतर तालुक्यांतही अशाप्रकारचे नियोजन करण्यास त्यांनी सांगितले आहे. यासाठी लहान मुलांना लागणारे वेगळे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मास्क, औषधी आदींबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर लहान मुलांची काळजी घेण्यासाठी अधिक संवेदनशील व संख्येने स्टाफ, नर्सची आवश्यकता पडणार आहे. त्याचेही नियाेजन करण्यास सांगितले. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या बालरोग तज्ज्ञांशिवाय आणखी काही मिळविता आल्यास त्या दृष्टीने ही प्रयत्न करण्यास सांगण्यात आले.