सेनगावात डॉक्टरचे घर फोडले ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:57+5:302021-08-25T04:34:57+5:30
सेनगाव शहरातील खंदारे पेट्रोल पंपाच्या समोरील भागात डॉ. मधुकर शंकरअप्पा बुकसेटवार यांचे घर आहे. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ...
सेनगाव शहरातील खंदारे पेट्रोल पंपाच्या समोरील भागात डॉ. मधुकर शंकरअप्पा बुकसेटवार यांचे घर आहे. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते घरास कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. २३ ऑगस्टच्या रात्री २ वाजेच्या सुमारास ते परत घरी आले. तेव्हा घराच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, सपोनि लोकडे, पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
यावेळी घरातील दिवाणात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे स्पष्ट झाले. यात २२ हजार ५०० रुपये किमतीचे ५ ग्रॅम पेंडॉल, २७ हजार रुपये किमतीचे प्रत्येकी ३ ग्रॅम दोन ओम, ४५ हजार रुपये किमतीचे १ तोळ्याचे गंठण, १३ हजार ५०० रुपये किमतीची अंगठी, १३ हजार ५०० रूपये किमतीचे कानातील दोन वेली व रोख ७ हजार रुपयांचा समावेश आहे. याप्रकरणी डॉ. मधुकर बुकसेटवार यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.