कोरोना काळात घटले डॉक्टरांचे वजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:27+5:302021-05-27T04:31:27+5:30
मागील एक ते दीड वर्षापासून कोरोनाचा कहर काही केल्या कमी व्हायला तयार नाही. यामध्ये मागच्या दिवाळीनंतर थोडाबहुत फरक जाणवला ...
मागील एक ते दीड वर्षापासून कोरोनाचा कहर काही केल्या कमी व्हायला तयार नाही. यामध्ये मागच्या दिवाळीनंतर थोडाबहुत फरक जाणवला होता. मात्र पुन्हा फेब्रुवारीपासून दुसरी लाट उसळली. यावेळी शहरीच नव्हे, ग्रामीण भागालाही कोरोनाने चांगलाच फटका दिला. ग्रामीण भागात अनेक गावांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडते की काय? असे चित्र निर्माण झाले होते. त्यात रुग्णालयात आधीच अपुरी यंत्रणा आणि त्यात वाढत्या रुग्णसंख्येचा ताण असे चित्र असल्याने अनेक डॉक्टरांना स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देता आले नाही. यात अनेकांचे वजन घटले असून काहींना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांचे वजन घटल्याचे चित्र आहे.
आहाराची घेतात काळजी
सध्या कोरोनाची लाट ओसरलेली नसल्याने डॉक्टरांनाही रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहावी म्हणून सकस आहाराकडे लक्ष ठेवावे लागत आहे
ज्यांना अंडी, मांसाहार शक्य ते त्याकडे वळत असून ज्यांना शक्य नाही ते पालेभाज्यांसह प्रोटीनयुक्त भोजनाच्या सेवनाकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत.
कामाच्या वेळेचे काही बंधन नाही. शिवाय रुग्णसेवा व प्रशासकीय अशा दोन्ही बाबी अनेकांना बघाव्या लागत असल्याने जेवणाच्या वेळा पाळणे शक्य होत नाही
धावपळीमुळे वजन कमी झाले, काहींचे बाधा झाल्याने घटले
कोरोनाच्या काळात सातत्याने विविध कामांमध्ये गुंतून राहावे लागत आहे. रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यापासून ते बरा होवून बाहेर पडेपर्यंत त्यावर लक्ष ठेवावे लागते.
औषधी पुरवठा, रुग्ण समाधान, ऑक्सिजन, नातेवाईकांना मनाई, तपासणीचे रिपोर्ट मिळणे आदीसाठी सातत्याने यंत्रणेत एकमेकांशी संपर्क व समन्वय ठेवावा लागत आहे.
कोरोना येण्याच्या पूर्वी आम्ही आमची दिनचर्या पाळू शकत होतो. या महामारीच्या काळात अनंत अडचणींचा सामना करीत परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक डॉक्टरांचे वजन घटत आहे. वाढलेली धावपळच याला कारणीभूत आहे.
डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अचानक वाढली. सेवा आणि प्रशासकीय नियोजन अशा दुहेरी कसरतीत कामाच्या तासांचे मोजमापच उरले नव्हते. त्यामुळे साहजिकच या दबावामुळे वजन घटणे अनिवार्य आहे. शिवाय अनेकदा जेवणासाठीही वेळ मिळत नव्हता.
डॉ.दीपक मोरे, जिल्हा रुग्णालय
कोरोनाच्या काळात कधी काय इमर्जंशी येईल. त्यात कुणाला कधी काय काम लागेल हे सांगता येत नव्हते. प्रशासकीय व रुग्णसेवा अशा १२ ते १३ तासांच्या ड्युटीजचा अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला. या काळात सुटीही क्वचितच म्हणण्यापेक्षा आजारपणातच मिळाली. त्यामुळे वजन घटणे अपरिहार्य आहे.
डॉ.देवेंद्र जायभाये, हिंगोली
शासकीय कोविड सेंटर ९
डॉक्टरांची संख्या ८०
आरोग्य कर्मचारी ३००